हिमायतनगर, दत्ता शिराणे| हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणूकीचे जोरदार वारे वाहत आहेत. लोकसभेच्या निवडणूकी प्रमाणे राज्यात महाविकास आघाडी ही कायम राहणार असल्याचे आता जवळपास निश्चितच असल्याने इच्छुकांची संख्या आपसूकच वाढली आहे. हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस चे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे आघाडीकडून उमेदवार हे निश्चित मानले जात असले तरी काँग्रेस पक्षाकडून आणखीन एक नवीन चेहरा इच्छुक म्हणून समोर येऊ लागला आहे. काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर हे आगामी निवडणूकीची तयारी करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. या बाबतीत देवसरकर यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले की, काँग्रेस पक्षांमध्ये अनेक वर्षांपासून काम करीत आहे. काँग्रेस पक्षांच्या तालूका अध्यक्ष पदाची धुरा जवळपास दहा वर्ष मी समर्थपणे सांभाळली असून, पक्षाचे निष्ठेनं काम सातत्याने करीत आहो. त्यामुळे मला पक्षाने विधानसभा लढविण्याची संधी दिली तर मी हदगाव, हिमायतनगर विधानसभेची निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे विकास पाटील देवसरकर यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना सांगीतले आहे.


आगामी विधान सभेच्या निवडणूका ह्या ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये होण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस, राष्ट्र वादी शरद पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ठाकरे गट व इतर मित्र पक्ष आघाडी करून निवडणुकीला सामोरं गेले. तर भाजप , बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट व इतर मित्र पक्ष मिळून महायुती करूण निवडणूक लढविल्या गेली. लोक सभेच्या निवडणूकीत मात्र महा विकास आघाडीला राज्यात चांगले यश मिळाले. त्यामुळे आघाडीच्या नेत्यामध्ये व तसेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आता विधानसभेच्या निवडणुकीत ही आघाडी कायम राहणार हे सुद्धा आता जवळपास निश्चितच मानल्या जाते आहे. परवाच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत नांदेड जिल्ह्य़ातील आमदार फुटले आणी तेही काँग्रेस मधले आहेत… असा प्रचार जग जाहीर झाला. मात्र ते दोन आमदार कोण ही बाब सध्यातरी गुलदस्त्यातच आहे.


नांदेड जिल्ह्याची कमान सांभाळणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजपात गेल्यामुळे नांदेड जिल्ह्य़ात काँग्रेसला मोठे भगदाड पडले. मात्र लोक सभेच्या निवडणूकीत अशोकरावाचा करिष्मा फारसा चालला नाही. मात्र जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची पकड अजूनही मजबूतच आहे हे सत्यता नाकारून चालणार नाही. तसेच हदगाव हिमायतनगर विधान सभेतील काँग्रेसचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अतिशय जवळचे मानले जातात. आणी विशेष बाब अशी की, २००९ ला अशोक पर्वा मुळेच आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा उदय झाला. हि सत्यता कोणालाही नाकारता येणार नाही. राजकारणात शक्य अशक्य असे काहिच सांगता येत नाही.


आगामी विधान सभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे भाजपात प्रवेश करू शकतात. तसे झाल्यास काँग्रेस पक्षाकडून नवीन चेहर्याचा शोध घेतला जावू शकतो. म्हणूनच की काय? विकास पाटील देवसरकर हे आपला पत्ता उघडा करीत आहेत. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. राजकारणात केव्हा आणी कधी काहिंही होवू शकते. असे मानले जाते. सध्यातरी विकास पाटील देवसरकर यांच्या नावांची चर्चा मोठ्याप्रमाणात होत असल्याचे ऐकिवात आहे. त्या पद्धतीने त्यांनी तयारी सुरु केली असून, त्यांच्या सुविद्य पत्नी पंचायत समिती उपसभापती पदी चांगला कार्य केला. खुद्द विकास पाटील यांनी युवक काँग्रेमध्ये ७ वर्ष आणि काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी आठ वर्ष सांभाळले. त्यांच्या कार्यकाळात हिमायतनगर नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघाच्या निवडणूक जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आणल्या होत्या.



