हिमायतनगर,अनिल मादसवार। गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या हिमायतनगर येथील श्री परमेश्वराच्या महाशिवरात्री यात्रा उत्सवाला आता रंग चढला आहे. आज दिनांक ०७ शुक्रवारी शेतकरी व बळीराजासाठी महत्त्वाचा मानला जाणारा बैलगाडी शर्यतीचा कार्यक्रम म्हणजेच शंकरपट स्पर्धेची सुरुवात ( The grand Shankarpat competition during the Shri Parmeshwar Yatra ) माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते झाली आहे. पहिल्या दिवशी जवळपास 30 ते 40 स्पर्धकांनी या शंकरपट स्पर्धेत सहभाग घेतला असून, शंकरपटाच्या मैदानावर धावणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या चित्त थरारक दृश्याने अनेकांचे डोळ्याचे पारणे फिटले आहे.



हिमायतनगर येथील श्री परमेश्वर यात्रेत शेतकरी राजासाठी केवळ एकच पशुप्रदर्शन स्पर्धा होत होती. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर तब्बल अकरा वर्षानंतर हिमायतनगर येथील श्री परमेश्वर महाराजांच्या महाशिवरात्री यात्रेत शंकरपट स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी बैलगाडा शर्यतीची तयारी गेल्या महिन्याभरापासून शंकरपट समितीचे अध्यक्ष संतोष गाजेवार, ज्ञानेश्वर शिंदे, प्रवीण शिंदे, श्याम पाटील व त्यांचे सहकारी दिवस-रात्र मेहनत घेऊन करत होते. या स्पर्धेची सुरुवात शुक्रवारी करण्यात आली असून तत्पूर्वी श्री परमेश्वर मंदिरापासून बँड बाजाच्या गजरात स्पर्धा ठिकाणापर्यंत भव्य अशी पटाच्या बैलजोडीसह मिरवणूक करण्यात आली. या मिरवणुकीत शेतकरी मंदिर कमिटीचे सदस्य, मान्यवर नागरिक, युवक डोक्यावर फेटा बांधून सहभागी झाले होते.

प्रथमतः श्री परमेश्वर मंदिरात एका खिल्लारी बैलजोडीचे पूजन माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, मंदिर कमिटीच्या अध्यक्षा पल्लवीताई टेमकर, उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. येथून निघालेली मिरवणूक मुख्य रस्त्याने राष्ट्रीय महामार्गावरील तहसील रेल्वेगेटजवळतयार करण्यात आलेल्या मैदानावर पोहोचली. या ठिकाणी पटाच्या शर्यतीसाठी तयार असलेल्या बैलजोडीचे पूजन करून बैलगाडा शर्यतीचा प्रारंभ करण्यात आला. यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेले या स्पर्धेसाठी दूर दूर वरून बैलगाडा शर्यतीत सामील होण्यासाठी बैल जोड्या दाखल झाल्या होत्या. ही स्पर्धा दोन दिवस चालणार असून, दिनांक 08 रोजी बैलगाडा शर्यतीचा समारोप केला जाणार आहे. दरम्यान स्पर्धास्थळी श्री माने सोनारीकर यांच्यातर्फे थंड शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.

या स्पर्धेमध्ये अ गटात सहभागी झालेल्या विजेत्यां बैलगाडा मालकास प्रथम बक्षीस म्हणून 55 हजार 555 रुपयांचे बक्षीस माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या तर्फे ठेवण्यात आले आहे. दुसरे बक्षीस 33 हजार 333 रुपयांचे बक्षीस अभिषेक लुटे यांच्यातर्फे ठेवण्यात आले आहे. तर तिसरे बक्षीस २२ हजार २२२ रुपयांचे बक्षीस प्रसिद्ध व्यापारी शेख रफिक शेख मेहबूब यांच्यातर्फे ठेवण्यात आले आहे. तसेच जवळपास बारा बक्षिसे अ गटातील बैलजोडीच्या विजेत्यांसाठी जाहीर करण्यात आले आहेत. तर ब गटातील बैलजोडींसाठी देखील आमदार जवळगावकर यांच्या तर्फे 21 हजाराचे पहिले बक्षीस देण्यात येणार आहे. दुसरे बक्षीस विठ्ठल शिंदे यांच्यातर्फे तर तिसरे बक्षीस संतोष गाजेवार यांच्यावतीने ठेवण्यात आले आहे. तसेच ब गटातील विजेत्यांसाठी 15 प्रकारचे बक्षीस ठेवण्यात आले असून, जवळपास तीन लाख रुपयांचे बक्षिस शंकर पटाच्या स्पर्धेसाठी ठेवण्यात आली आहेत अशी माहिती शंकर पट समितीचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली आहे. यावेळी हिमायतनगर शहर व पंचक्रोशीतील अनेक मान्यवर नागरिक, व्यापारी, शंकरपट शौकीन मोठ्या संख्येने बांधव उपस्थित होते.
