हिमायतनगर, अनिल मादसवार| संबंध भारतात प्रसिद्ध असंलेल्या हिमायतनगर येथील श्री परमेश्वराच्या यात्रेला महाशिवरात्रीपासून सुरुवात झाली असून, ही यात्रा 12 मार्च म्हणजे होळी रंगपंचमी पर्यंत चालणार आहे. यात्रेच्या सुरुवातीच्या सात दिवसाच्या सत्रात अखंड हरिनाम सप्ताह, विना पारायण सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आदींसह दररोज कीर्तन व इतर धार्मिक कार्यक्रम भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. यात्रेत विविध प्रकारचे उंच आकाश पाळणे, मनोरंजन व इतर साहित्याची दुकाने दाखल झाल्याने आता खऱ्या अर्थाने यात्रेला रंगत आली आहे.


महाशिवरात्री निमित्ताने विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक आदी राज्यातील लाखो भावी भक्तांनी उपस्थित होऊन वाढोणा येथील श्री परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. परमेश्वर मूर्तीबाबत सांगितले जाते कि, हि मूर्ती साडेसातशे वर्षांपूर्वी येथील शेतात नांगरणी करताना शेतकऱ्याला आढळून आली होती. त्याकाळी श्री परमेश्वर मूर्तीची विधिवत स्थापना करून यात्रा भरविण्यास सुरुवात करण्यात आली होती. तीच परंपरा आजही अविरतपणे चालू असून, जवळपास पंधरा दिवस हि यात्रा चालते. आज घडीला श्री परमेश्वर मंदिराचे कामकाज येथील पदसिद्ध अध्यक्ष व विश्वस्तांच्या अखत्यारीत चालविले जाते. मंदिराचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते व वीस संचालकाच्या माध्यमातून पारदर्शक कामे सुरु आहेत.

यावर्षी मंदिराच्या वतीने मूर्तीच्या कमानीला ४३ किलो विजांच्या चांदीचा लेप लावला असून, गतवर्षी दोन किलो सोन्याचे आभूषणे बनविण्यात आली आहेत. मूर्तीची सोन्याचे दागिने आणि चांदीच्या लेपामुळे मंदिर सौंदर्यात भर पडली आहे. अलंकारमय मूर्ती व यात्रेकरू भाविक भक्तांच्या सुरक्षेसाठी तब्बल ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, यात्रेतील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या सूचनेवरून चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

श्री परमेश्वराच्या यात्रेत आत्तापर्यंत महिलांच्या विविध स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा, पशुप्रदर्शन आदी कार्यक्रम संपन्न झाले असून, दिनांक सात आणि आठ मार्च रोजी भव्य शंकरपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दिनांक आठ रोजी भव्य भजन स्पर्धा होणार असून, नऊ तारखेला रविवारी कबड्डी स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. याच दिवशी रात्रीला शालेय विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 11 मार्च रोजी भव्य कुस्त्यांची दंगल होणार आहे, या स्पर्धेला राज्यभरातून मल्ल दाखल होणार असून, या स्पर्धेसह यात्रेचा आनंद घेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित व्हावे असे आवाहन मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
