Hadgaon city : हदगाव शहरात नागरी प्रश्न जैसे थे… सत्ता बदलली; मात्र रस्ते व नागरी समस्या कायमच!

हदगाव, शेख चांदपाशा | हदगाव नगर परिषदेच्या निवडणुका पार पडून नवे नगरसेवक निवडून आले, सत्ता स्थापन झाली; मात्र पदवाटपाचे राजकारण, विषय समितीच्या बैठका रद्द होणे या सगळ्यात शहरातील मूलभूत नागरी प्रश्न मात्र आजही जैसे थे असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

निवडणूक काळात विविध राजकीय पक्षांनी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, क्रीडांगण, उद्याने, सभागृह यांसारख्या सुविधांची मोठमोठी आश्वासने दिली होती. मात्र प्रत्यक्षात नागरिकांना अद्यापही त्याच जुन्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने शहरातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

जीवघेणे खड्डे; अपघातांना निमंत्रण – शहरातील प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. आझाद चौक, राठी चौक, जामा मस्जिद रोडसह अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अपघातांची शक्यता वाढली असून चौकांमध्ये हायमास्ट दिव्यांची तातडीने गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कचराकुंड्यांचा अभाव; अस्वच्छतेचे साम्राज्य – शहरात कचराकुंड्या नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर साचत असून दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

भटके कुत्रे व मोकाट जनावरांचा उपद्रव – हदगाव शहरात भटके कुत्रे व मोकाट जनावरांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मुख्य रस्त्यांवरच ही जनावरे ठाण मांडून बसत असल्याने लहान मुले, महिला व वृद्ध नागरिकांसाठी धोका निर्माण झाला आहे.

अतिक्रमणावर दुहेरी मापदंड? – शहरात अतिक्रमणाचे ग्रहण लागले असतानाही कारवाई केवळ पथविक्रेत्यांपुरतीच मर्यादित असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मोठ्या व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणांकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा संताप व्यक्त होत आहे.

नागरिकांचा सवाल – नव्याने रुजू झालेल्या महिला मुख्याधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती अन्यया रेड्डी शहराच्या ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष देतील का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. सत्ता कोणाचीही असो, आमच्या समस्या सुटल्या पाहिजेत, अशी ठाम भूमिका सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.


🏛️ नवीन नगरसेवकांनी कामाला लागावे!

सत्ता स्थापन होऊन बराच कालावधी लोटला असतानाही अद्याप विषय समिती सभापतींची निवड झालेली नाही. याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आता तरी नगरसेवकांनी राजकारण बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तात्काळ क्रियाशील व्हावे, अशी जोरदार मागणी हदगावकर नागरिकांकडून होत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button