बिलोली| तालुक्यातील मिनकी येथील राजेंद्र लक्ष्मण पैलवार व ओंकार राजेंद्र पैलवार या पिता पुत्राने एकाच दोरीच्या साह्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. ९ जानेवारी रोजी उघडकीस आली. याबाबत दैनिक प्रजावाणी मध्ये वृत्तांत प्रकाशित होताच अनेक संस्था आणि व्यक्तींनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वना करत मदतीचे आश्वासन दिले.
मिनकी येथील शेतकरी राजेंद्र लक्ष्मण पैलवार यांचा ओंकार राजेश पैलवार हा मुलगा बाहेर गावी शिक्षणास होता. तो सध्या मकर संक्रांतीच्या सना निमित्त गावाकडे आला होता. संक्रांतीचा सन असल्याने ओंकार याने आपल्या वडिलांकडे नवीन कपडे व मोबाईल घेण्यासाठी पैशाची मागणी केल्याचे कळाले. यावेळी राजेंद्र पैलवार यांनी सततची नापीकी, बॅकेचे कर्ज आणि वाढते शैक्षणिक खर्च यामुळे आता माझ्याकडे पैसे नाहीत आपण कपडे व मोबाईल नंतर घेऊ असे सांगितले होते. यामुळे नाराज झालेला ओंकार हा घरातुन बाहेर पडला.
दि.९ रोजी सकाळी राजेंद्र पैलवार हे मुलाचा शोध घेत असताना ओंकार याचा म्रतदेह शेतातील लिंबाच्या झाडाला लटकल्याचे दिसून आल्यानंतर मुलाने गळफास घेतलेल्या दोरीने पित्याने ही गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याचा वृत्तांत दैनिक प्रजावाणी मध्ये प्रकाशित झालेला होता. याची दखल घेऊन नाम फाउंडेशनचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिकांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. यात भाऊसाहेब मोरे आणि साहेबराव जाधव यांचा समावेश होता. यावेळी पीडित कुटुंबीयांची सांत्वना करत मदतीचे आश्वासन दिले. शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना शासन काय मदत करेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान शिक्षणतज्ञांनी शिक्षणात जीवनातील नैराश्य आणि त्यावरील उपाय या बाबी शिक्षणात असाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.