हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या पाच दिवस चालेल्या यात्रेचा समारोप कुस्त्यांच्या दंगलीने करण्यात आला. श्री पार्श्वनाथ महादेव मंदिराच्या यात्रेच्या शेवटच्या दिवशी कुस्त्यांची दंगल मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी शेवटची मानाची कुस्ती हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी येथिल निलेश शनेवाड या पैलवानाने जिंकून कुस्तीचा फड गाजविला आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पैलवानाच अभिनंदन करत पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पाचशिव महादेव फाटा येथील श्री पार्श्वनाथ महादेव मंदिराच्या यात्रेच्या शेवटच्या दिवशी कुस्त्यांची दंगल मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. कुस्ती स्पर्धेसाठी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, पोलीस निरीक्षक अमोल भगत, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ताभाऊ शिराणे, आदींसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. शुक्रवारी आयोजित करण्यात आलेली कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती.
मागील अनेक वर्षापासून हिमायतनगर तालुक्यातील महादेव फाटा येथे पार्श्वनाथ मंदिराची यात्रा जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांच्या पुढाकारातून पंचक्रोशीतील नागरिक, राजकीय पुढारी, वारकरी संप्रदायातील नागरिक, शेतकरी, मजुरदार व भजनी मंडळाच्या सहकार्याने भरविली जाते आहे. यंदा पार्श्वनाथ महादेव यात्रेला दिनांक ०५ पासून सुरुवात झाली असून, यात्रेचा आनंद परिसरातील हजारो महिला पुरुष व बालगोपाल भाविकांनी घेतला. यात्रेच्या पाच दिवसाच्या कालावधीत विविध स्पर्धा संपन्न झाल्या असून, यात व्हॉलीबॉल, पशुप्रदर्शन, शालेय खो खो स्पर्धा, कब्बड्डी स्पर्धा, शंकरपट आणि शेवटची कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती.
कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तेलंगणा, मराठवाडा, विदर्भ राज्यातील विविध ठिकाणाहून मोठ्या संख्येने पैलवान दाखल झाले होते. सकाळी ११ वाजतापासून सुरुवात झालेली कुस्त्यांची दंगल सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रकाश झोतात चालली. शेवटची मानाची कुस्ती हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी येथील पैलवान निलेश शनेवाड यांनी जिंकून पहिला मान मिळविला आहे. त्याने मिळविलेल्या कुस्ती स्पर्धेतील यशाबद्दल अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आणि बक्षीस देऊन गौरविण्यात आले. पुढील वर्षी याही पेक्षा उत्कृष्ट नियोजन कुस्त्यांच्या दंगलीसाठी करण्यात येतील असे आश्वासन यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आले.