नांदेड, प्रतिनिधी| अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होत असून, आंदोलनांच्या माध्यमातून दोन्ही समाज आमनेसामने येत आहेत. या संवेदनशील प्रश्नावर सामंजस्याने तोडगा काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड यांनी केली.


नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रा. देविदास मनोहरे, जनार्दन कवडे, ज्येष्ठ पत्रकार बंधुराज लोणे आणि नंदकुमार बनसोडे उपस्थित होते.


सुरेशदादा गायकवाड म्हणाले की, अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा विषय सुरुवातीच्या काळातच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी गांभीर्याने घेतला असता, तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती. आता या मुद्द्यावरून दोन समाज आमनेसामने येणे योग्य नाही. अशा प्रकारे सामाजिक संघर्ष वाढत गेला, तर भविष्यात ओबीसी आणि आदिवासी समाजांमध्येही उपवर्गीकरणाच्या मागण्या पुढे येऊ शकतात. त्यामुळे समाजात अधिक मोठी दुफळी निर्माण होण्याची शक्यता आहे.



‘सरकारच्या राजकीय फायद्यासाठी उपवर्गीकरणाचा विषय पुढे आणला जात आहे,’ असा आरोपही गायकवाड यांनी केला. या मुद्द्यावरून समाजात निर्माण झालेली तेढ कमी करण्यासाठी संवाद आणि राजकीय वाटाघाटींचा मार्ग स्वीकारणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अभ्यास असून विविध समाजातील नेत्यांशी त्यांचा संवाद आहे. त्यामुळे त्यांनी या प्रश्नात मध्यस्थी करून सर्व संबंधित घटकांशी संवाद साधावा आणि उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा गायकवाड यांनी व्यक्त केली.
सरकारने सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करावी उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर राज्य सरकारनेही सक्रिय भूमिका घेणे आवश्यक असून, राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करावी, अशी मागणी सुरेशदादा गायकवाड यांनी केली.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील बौद्ध समाजाच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाबाबत बोलताना गायकवाड म्हणाले की, केवळ मोर्चे काढून हा प्रश्न सुटणार नाही. सरकार आणि संबंधित घटकांमध्ये चर्चा व राजकीय वाटाघाटी होऊनच या संवेदनशील प्रश्नावर मार्ग निघू शकतो. दोन समाजांमध्ये संघर्ष निर्माण होण्याऐवजी संवादातून तोडगा काढण्याची गरज असून, त्यासाठी सर्व राजकीय व सामाजिक नेतृत्वाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

