नांदेड| जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमानात घट झाली आहे. त्यामुळे आगामी काळात संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता उपलब्ध पावसाच्या पाण्याचे जास्तीत जास्त संवर्धन करून भूजल पातळी वाढविण्यासाठी जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घ्यावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.


सेवा संकल्प अभियानांतर्गत रोजगार हमी योजना तसेच विकसित भारत रोजगार व आजीविका हमी ग्रामीण योजनेच्या माध्यमातून जलतारा, सिमेंट नाला बांध, विहीर पुनर्भरण आणि बोअरवेल पुनर्भरणाच्या कामांना गती देण्यात येत आहे.


ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देतानाच टिकाऊ व उत्पादक मालमत्ता निर्माण करणे हा रोजगार हमी योजनेचा उद्देश आहे. जमीन, पाणी आणि वृक्षांच्या विकासातून शेती व शेतीपूरक उत्पादक मालमत्ता निर्माण करण्यावर या योजनेंतर्गत भर देण्यात येत आहे. पावसाचे पाणी वाहून न जाता ते अडवून जमिनीत मुरविण्यासाठी या कामांचा मोठा फायदा होणार आहे.



शेतकरी, ग्रामस्थ आणि नागरिकांनी आपल्या गावातील तसेच शेतजमिनीवरील आवश्यक जलसंधारणाच्या कामांचे प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायतीकडे सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जलतारा, सिमेंट नाला बांध, विहीर पुनर्भरण आणि बोअरवेल पुनर्भरणाच्या कामांना प्राधान्य देता येणार आहे.
शेतजमिनीवर किंवा परिसरात ही कामे करून घ्यावयाची असल्यास ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक किंवा पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधून कामाची मागणी नोंदविता येणार आहे. प्राप्त प्रस्तावांची नियमानुसार तपासणी करून पात्र व अनुज्ञेय कामांचे नियोजन करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतींनीदेखील आपल्या कार्यक्षेत्रातील जलस्रोत, नाले, पाणलोट क्षेत्र, विहिरी आणि बोअरची सद्यस्थिती लक्षात घेऊन कामांना प्राधान्यक्रम द्यावा. ग्रामसभेत या कामांचा एकत्रित आराखडा तयार करून मान्यतेनंतर पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतातील पाणी एकवटणाऱ्या उताराच्या ठिकाणी अथवा जमीन चिभडणाऱ्या ठिकाणी साधारण ५ फूट रुंद, ५ फूट लांब आणि ६ फूट खोल खड्डा तयार करून त्यामध्ये मोठे व मध्यम आकाराचे दगड भरून जलतारा तयार केला जातो. एका जलताऱ्यातून सुमारे ३.६० लाख लिटर पाणी जमिनीत मुरविण्याची क्षमता असल्याने विहीर आणि बोअरवेलमधील पाणीसाठा वाढण्यास मदत होते.
जलतारा, विहीर व बोअर पुनर्भरणाच्या माध्यमातून पावसाचे पाणी स्थानिक पातळीवर अडवून जमिनीत मुरविणे, भूजल पातळी वाढविणे आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता टिकविणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर रोजगार हमीच्या माध्यमातून ही कामे होत असल्याने ग्रामीण नागरिकांना स्थानिक पातळीवर रोजगारही उपलब्ध होणार आहे.
नांदेड जिल्ह्यात १ लाख जलतारा करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे. आतापर्यंत ३५ हजार ७७५ जलताऱ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यापैकी ३१ हजार ३६० कामांना तांत्रिक मान्यता, तर २८ हजार ४०१ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यापैकी २ हजार १ जलताऱ्यांची कामे प्रत्यक्ष सुरू झाली आहेत.
संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढाकार घेऊन आपल्या गावातील व शेतजमिनीवरील आवश्यक जलतारा, सिमेंट नाला बांध, विहीर पुनर्भरण, बोअरवेल पुनर्भरण तसेच इतर जलसंधारणाच्या कामांचे प्रस्ताव तातडीने ग्रामपंचायतीकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. “पाणी अडवा-पाणी जिरवा, भूजल वाढवा-पाणीटंचाई टाळा” या उद्देशाने ग्रामस्थ, शेतकरी आणि ग्रामपंचायतींनी जलसंधारणाच्या कामांमध्ये व्यापक सहभाग नोंदवावा, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

