Himayatnagar : हिमायतनगरात बॅनरबाजीचे उच्छाद… उच्च न्यायालयाच्या आदेशांचे सर्रास उल्लंघन

Nagar panchayat 1 Himayatnagar : हिमायतनगरात बॅनरबाजीचे उच्छाद... उच्च न्यायालयाच्या आदेशांचे सर्रास उल्लंघन

हिमायतनगर,अनिल मादसवार | हिमायतनगर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून अस्ताव्यस्त व अनधिकृत बॅनर लावले जात असून, यामुळे उच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशांचे सर्रास उल्लंघन होत आहे. मात्र या गंभीर बाबीकडे नगर पंचायत प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे चित्र असून, केवळ थातुरमातूर कारवाई करून काही मर्जीतील लोकांना कुठेही बॅनर लावण्याची मुभा दिली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

या अनियंत्रित बॅनरबाजीचा फटका थेट शहरातील मुख्य रस्त्यावरील दुकानदार, वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना बसत आहे. रस्त्यांवर व चौकाचौकात लटकविलेले बी बांधलेले बॅनर वाहतुकीस अडथळा ठरत असून, शहरातील वाहतूक कोंडीमध्ये भर पडत आहे. त्याचबरोबर शहराचे विद्रुपीकरणही मोठ्या प्रमाणात होत आहे.

शहराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते विविध चौक, रुग्णालय परिसर तसेच नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर अपघातांना निमंत्रण देणारे ठरत असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. विशेषतः वारा, पावसात हे बॅनर अचानक खाली पडण्याची भीती कायम असल्याने मोठी दुर्घटना घडण्याचा धोका नाकारता येत नाही.

भविष्यात गंभीर अपघात घडण्यापूर्वी नगर पंचायत प्रशासनाने जागेवरून ठोस निर्णय घ्यावा, अनधिकृत बॅनर तात्काळ हटवावेत आणि उच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार केवळ निश्चित जागांवरच बॅनर लावण्याची परवानगी द्यावी, अशी ठाम मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.

“हिमायतनगर नगरपंचायतीवर सत्ताधारी बसले आहेत. आता नूतन पदाधिकाऱ्यांनी तरी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत शहराच्या विद्रुपीकरणाला कारणीभूत ठरणाऱ्या बॅनरबाजीला लगाम घालावा. बॅनरसाठी योग्य जागा निश्चित करून जनतेला व व्यापाऱ्यांना होणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी ठोस व तातडीचे निर्णय घ्यावेत, हीच नागरिकांची अपेक्षा आहे.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top