नागपूर, प्रतिनिधी| पावसाने पाठ फिरवल्याने राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, दुष्काळी यादीतून वगळलेल्या तालुक्यांनाही सरकारने वाऱ्यावर सोडलेले नाही. अशा तालुक्यांची प्रत्यक्ष तपासणी करून आवश्यकतेनुसार ‘ट्रिगर-३’ अंतर्गत मदत दिली जाईल. दुष्काळाचा सामना करताना मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शासनाच्या उपाययोजनांबाबत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. पर्जन्यमानातील तूट आणि अन्य निकषांमुळे २६५ तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर झाली असून, या भागात १२ प्रकारच्या उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत.
पीक नुकसानीची मदत मिळणार – दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विहित कार्यपद्धती पूर्ण करून मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यादीत नाव नाही म्हणून मदतीचे दरवाजे बंद होणार नाहीत. यादीबाहेरील तालुक्यांची तपासणी करून परिस्थितीनुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
पाण्याचा प्रश्न सरकारच्या रडारवर – दुष्काळात सर्वात मोठे आव्हान पिण्याच्या पाण्याचे आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी पाणी उपलब्धतेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देऊन त्यानंतर उपलब्ध अतिरिक्त पाण्याचा रब्बी हंगामासाठी वापर करता येईल का, याचा विचार केला जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
अल निनोवरही सरकारची नजर – अल निनोमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा अभ्यास सुरू असून, फेब्रुवारी अखेरपर्यंत त्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
भामरागडच्या पूरग्रस्तांनाही मदतीचा हात – गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरात छत्तीसगडमधील अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. प्रशासनाकडून पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत दिली जात असून, आपण प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पूरस्थिती आता हळूहळू निवळत असून जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांनाही सहकार्याचे आवाहन – दुष्काळाचे संकट केवळ सरकारचे नसून समाजानेही त्याला सामोरे जाण्याची गरज आहे. अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना शक्य ती मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.