हिमायतनगर, अनिल मादसवार| शासन व पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत हिमायतनगर शहरातील गणेश मंडळांनी यंदाचा गणेश विसर्जन सोहळा डीजेविरहित आणि अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पाडला. टाळ-मृदंगाचा गजर, भजनी मंडळांचे अभंग, वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन, फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी अशा उत्साही वातावरणात लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.


‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया!’ च्या जयघोषात हिमायतनगर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळपासून भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. यंदा गणेश मंडळांनी डीजेचा वापर टाळत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले. टाळ-मृदंगाच्या निनादात भजनी मंडळांनी अभंग व भक्तिगीते सादर केली. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा सुंदर संगम पाहायला मिळाला.


प्रमुख गणेशमूर्तींचे सकाळी साडेसात वाजता विसर्जन – अनंत चतुर्दशीचा मुहूर्त उशिरा असल्याने शुक्रवारी सुरू झालेली प्रमुख गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक शनिवारी सकाळपर्यंत सुरू होती. नामांकित व प्रमुख गणेशमूर्तींचे शनिवारी सकाळी साडेसात वाजता विसर्जन करण्यात आले. गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहाने मिरवणुकीत सहभाग घेत बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.

कनकेश्वर तलाव परिसरात प्रशासनाची चोख व्यवस्था – गणेश विसर्जनासाठी श्री कनकेश्वर तलावाच्या काठावरील विहिरीत नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात आली होती. मुख्याधिकारी समाधान मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जनस्थळी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले असून, मिरवणूक मार्गावर विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्यात आली होती.

गणेशभक्तांची सुरक्षितता लक्षात घेऊन अग्निशमन दल, जीव रक्षक तसेच आवश्यक सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली होती. त्यामुळे विसर्जनाची प्रक्रिया शिस्तबद्ध व सुरक्षित पद्धतीने पार पडण्यास मदत झाली. विसर्जन व्यवस्थेची पाहणी नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी श्री चव्हाण, नायब तहसीलदार श्री. पंगे, तलाठी श्री. रामदासी यांच्यासह सर्व नगरसेवकांनी केली.




पोलिसांचा चोख बंदोबस्त – विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरळीत पार पडावी, यासाठी उपविभागीय अधिकारी अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शेख यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मिरवणूक मार्गावर पोलिसांची उपस्थिती राहिल्याने विसर्जन सोहळा शांततेत पार पडला.
यंदाच्या गणेश विसर्जन सोहळ्यात डीजेविरहित मिरवणूक, टाळ-मृदंगाचा गजर, वारकरी परंपरेचा जागर आणि भक्तिमय वातावरण, सर्व धार्मियांचा सहभाग यामुळे हिमायतनगर शहरात सामाजिक सलोखा व सांस्कृतिक परंपरेचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला.

