Homeधार्मिकनांदेडकरांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेडकरांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

४० हजार ८९७ गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन; १५.१७६ मेट्रिक टन निर्माल्य संकलित

नांदेड, प्रतिनिधी| परंपरेसोबत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी जपत नांदेडकरांनी यंदाच्या गणेशोत्सवात नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक विसर्जन मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरात सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्तींचे मिळून तब्बल ४० हजार ८९७ मूर्तींचे पर्यावरण-पूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. तसेच विसर्जन स्थळांवरून १५.१७६ मेट्रिक टन निर्माल्याचे संकलन करण्यात आले. त्यामुळे गोदावरी, आसना नदीसह नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यास मोठी मदत झाली.

नदीपात्र, तलाव व अन्य नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने यंदा गणेशोत्सवापूर्वीच व्यापक जनजागृती मोहीम राबविली होती. सोशल मीडिया, शहरातील प्रमुख चौकांमधील होर्डिंग्ज, बॅनर्स व पोस्टर्सच्या माध्यमातून नागरिकांना मूर्ती व निर्माल्य नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जित न करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

FB IMG 1790432937400 नांदेडकरांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कृत्रिम तलाव, मूर्ती संकलन केंद्रांचा लाभ – नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि जलस्रोतांचे प्रदूषण टाळता यावे, यासाठी महापालिकेने शहरातील विविध भागांत कृत्रिम विसर्जन तलाव तसेच मूर्ती संकलन केंद्रे उभारली होती. नागरिकांनी या सुविधांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. अनेक भाविकांनी कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन केले, तर अनेकांनी मूर्ती संकलन केंद्रांवर मूर्ती सुपूर्द करून पर्यावरण संवर्धनात सहभाग नोंदविला.

FB IMG 1790432931641 नांदेडकरांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

महापालिकेच्या स्वच्छता पथकांनी विसर्जनाच्या दिवशी तत्परतेने काम करत विविध विसर्जन स्थळांवरून १५.१७६ मेट्रिक टन निर्माल्य संकलित केले. यामुळे नदीपात्र व विसर्जन स्थळे कचरामुक्त ठेवण्यास मदत झाली. शहरासोबतच ग्रामीण भागातील गणेशमूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्थाही महापालिका यंत्रणेमार्फत करण्यात आली.

FB IMG 1790432922611 नांदेडकरांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

१७ मूर्ती संकलन केंद्रे; ३५ आयचर वाहने तैनात – महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत १७ मूर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. निर्माल्य संकलनासाठी विविध ठिकाणी १४ निर्माल्य कलश व कंटेनर ठेवण्यात आले होते.

FB IMG 1790432944816 नांदेडकरांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मूर्ती संकलन केंद्रांवर जमा झालेल्या गणेशमूर्तींची वाहतूक करण्यासाठी ३५ आयचर वाहने, तर मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी २५ मोठ्या क्रेन तैनात करण्यात आल्या होत्या. प्रत्येक विसर्जन घाटावर विद्युत रोषणाई, जीव रक्षकांची टीम तसेच स्वच्छता निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता पथके सज्ज ठेवण्यात आली होती.

गोदावरी व आसना नदीतील पाणी प्रदूषित होऊ नये आणि जलसंपत्तीचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने लहान व मध्यम आकाराच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात, तर मोठ्या मूर्तींचे खदान व कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडला.

 

आयुक्तांकडून गणेशभक्तांचे आभार – महापालिकेच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाला नांदेडकरांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी सर्व गणेशभक्त, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, नागरिक तसेच अहोरात्र कार्यरत असलेल्या महापालिकेच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाचे मनःपूर्वक आभार मानले. मोठ्या गणेशमूर्तींच्या प्रतीकात्मक विसर्जनाला अपेक्षेपेक्षा अल्प प्रतिसाद मिळाल्याबद्दल आयुक्तांनी खंत व्यक्त केली असून, पुढील वर्षी यासाठी अधिक प्रभावी जनजागृती करण्याचा मानस व्यक्त केला.

आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशान्वये तसेच अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार व गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त अभिजित वायकोस, नितीन गाढवे, स. अजितपालसिंघ संधु, गंगाधर ईरलोड यांच्या नियंत्रणाखाली महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनामुळे गणेश विसर्जनाची व्यवस्था शांततेत व सुरळीतपणे पार पडली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments