नांदेड| भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर, 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या काळात जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या परिसरात उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव आणि आंदोलने करण्यास मनाई करण्यात आली आहे. या बाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहेत.
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या या आदेशानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तसेच सर्व उपविभागीय कार्यालये, जिल्ह्यातील इतर सर्व शासकीय व सर्व निमशासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव, आंदोलने इत्यादी आंदोलनात्मक कृतीला मनाई करण्यात आली आहे. हे आदेश 15 ऑक्टोबर, 2024 रोजी अंमलात आला असून हे आदेश 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत अंमलात राहतील.