नांदेड | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील १२ हजार ९२९ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १०६ कोटी २४ लाख ९८ हजार २३१ रुपये संबंधित बँकांकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. संबंधित रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करून त्यांना कर्ज बेबाकी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.


राज्य मंत्रिमंडळाने २ जून २०२६ रोजी या कर्जमुक्ती योजनेला मंजुरी दिली होती. त्यानंतर शासन निर्णयाद्वारे योजना लागू करण्यात आली. १५ जुलै २०२६ रोजी योजनेतील काही निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली.


योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील ३० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, १२ राष्ट्रीयीकृत बँका तसेच अन्य खासगी बँकांसह एकूण ५३ बँकांनी सुमारे ३२ लाख कर्जखात्यांचा डेटा महाआयटीच्या पोर्टलवर अपलोड केला आहे.



सहकार आयुक्त व निबंधक, पुणे यांच्या माहितीनुसार, योजनेच्या निकषांनुसार पात्र ठरलेल्या सुमारे १६.९६ लाख शेतकऱ्यांची पहिली यादी २५ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यापैकी ६ ऑगस्टअखेर १२.१० लाख कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.
दरम्यान, शासनाने २२ जुलै रोजी १ कोटी रुपये आणि ३० जुलै रोजी ७ हजार कोटी रुपये असा निधी सहकार आयुक्त व निबंधक, पुणे यांच्याकडे उपलब्ध करून दिला आहे. ७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या सुमारे ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५ हजार २८ कोटी रुपये ऑनलाइन पद्धतीने थेट हस्तांतरित करण्यात आले.
नांदेडमध्ये ६१ हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ६१ हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. तर ३५ हजार ८०६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे. पहिल्या यादीतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी तातडीने अॅग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासनाने सर्व बँकांना दिले आहेत. तसेच, उर्वरित पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच त्यांच्या कर्जखात्यांमध्येही कर्जमाफीची लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे : नांदेडमधील लाभार्थी : १२,९२९, वितरित रक्कम : ₹१०६.२५ कोटी, आधार प्रमाणीकरण पूर्ण : ६१ हजार शेतकरी, प्रमाणीकरण बाकी : ३५,८०६ शेतकरी, तातडीची कार्यवाही : अॅग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे

