हिमायतनगर, अनिल मादसवार | शहरातील वाढत्या डासांच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर डास प्रतिबंधक फवारणी करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने नगरपंचायत प्रशासनाकडे दोन महिन्यांपूर्वी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मात्र, अद्याप फवारणी न झाल्याने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला.


यासंदर्भात समाजवादी पार्टीचे तालुकाध्यक्ष अक्रम कुरेशी व त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी समाधान मसाळ यांची भेट घेऊन डास प्रतिबंधक फवारणीसाठी विलंब का होत आहे, अशी विचारणा केली. शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.


यावर मुख्याधिकारी समाधान मसाळ यांनी पंधरा दिवसांच्या आत संपूर्ण शहरात डास प्रतिबंधक फवारणी करण्यात येईल, असे आश्वासन दिले. दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मागणीवर आता प्रशासनाकडून प्रत्यक्ष कार्यवाही कधी सुरू होते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.




