पांडवकालीन कनकेश्वर तलावाच्या विकासाची मागणी – वाढोणा येथील पांडवकालीन कनकेश्वर तलाव परिसरातील निसर्गसौंदर्यामुळे नागरिक व भाविक आकर्षित होत आहेत. तलावात कायमस्वरूपी पाणीसाठा राहावा, तलावाचे खोलीकरण व्हावे, परिसरात बाग व प्रकाशव्यवस्था अधिक विकसित करावी, भाविकांसाठी बैठक व महाप्रसादासाठी शेडची सुविधा निर्माण करावी, तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी बोटिंगची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली. यावर आमदार कोहळीकर यांनी मंदिर परिसरातील विकासकामांना टप्प्याटप्प्याने प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.
‘दुष्काळमुक्त तालुक्यासाठी प्रयत्न सुरू’ – घारापूर येथील उच्च पातळी बंधाऱ्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील पाणीपातळी वाढण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार कोहळीकर यांनी व्यक्त केला. तालुक्यातील तलावांचे खोलीकरण करून शाश्वत पाणीसाठा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
“सुमारे ५०० फूट खोलीवर मिळणारे क्षारयुक्त पाणी आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी कसे उपलब्ध होईल, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात ही कामे पूर्णत्वास नेऊन परिसर सुजलाम् सुफलाम् करण्याचा आणि तालुका दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न आहे,” अशी ग्वाही त्यांनी श्री वरद विनायकाच्या साक्षीने दिली.



बंधाऱ्यांमुळे शेतीला मोठा फायदा होणार – पैनगंगा नदीवरील उच्च पातळी बंधाऱ्यांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, पावसाचे पाणी थेट तेलंगणा राज्याकडे वाहून जाण्याऐवजी त्याचा उपयोग परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांना व्हावा, हा या प्रकल्पांचा उद्देश आहे. निगनूर, सहस्त्रकुंड आणि घारापूर परिसरातील बंधाऱ्यांमधून पाणी अडविण्याची व्यवस्था केली जाणार असून, या बंधाऱ्यांवर हायड्रोलिक गेटची सुविधा राहणार आहे. पावसाचे प्रमाण अधिक झाल्यास गेटद्वारे पाणी नियंत्रित पद्धतीने पुढे सोडता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. “या बंधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊन खरीप, रब्बी अशा दोन्ही हंगामात पिके घेण्याची संधी वाढेल. पाणी हेच जीवन आहे, याची जाणीव आगामी काळात सर्वांना होईल,” असे आमदार कोहळीकर म्हणाले.

एमआयडीसी पाहणी; साखर कारखान्याला हिरवा कंदील – गणेशरायाच्या आगमनाच्या शुभदिनी मतदारसंघाच्या औद्योगिक विकासाबाबतही आमदार कोहळीकर यांनी महत्त्वाची माहिती दिली. एमआयडीसीसाठी पथकाने पाहणी केली असून साखर कारखाना मंजुरीच्या प्रक्रियेला हिरवा कंदील मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पाणी, सिंचन, शेती, उद्योग आणि पर्यटन या सर्व क्षेत्रांचा समन्वय साधून हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

यावेळी महावीरसेठ श्रीश्रीमाळ, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अक्कलवाड सर, रामराव सूर्यवंशी, विनय देशमुख सरसमकर, विकास पाटील देवसरकर, सुनील सुवर्णकार, रामराव पाटील चिंचाळकर, राम पाकलवार, वामनराव पाटील वडगावकर, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, शहर प्रमुख गजू हार्डपकर, नगरसेवक सुभाष बल्पेलवाड, नगरसेवक भारत डाके, डॉ. गणेश कदम, डॉ. राजेंद्र वानखेडे, बाळू अण्णा चवरे, राजू पिंचा, साहेबराव अष्टकर, संतोष पळशीकर, मारोती लुमदे पाटील, विलास वानखेडे, संतोष मुद्देवाड, नाथा पाटील, कल्याण पाटील, कदम सर, अनिल दमकोडवार, साहेबराव चव्हाण, रमेश डांगे, जनसंपर्क अधिकारी श्याम पाटील, शहरातील मान्यवर नागरिक, ज्येष्ठ नागरिक, शिवसैनिक कार्यकर्ते तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार कोहळीकर यांनी उपस्थित सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.



