हिमायतनगर, अनिल मादसवार | गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शहरात गणरायाच्या आगमनाचा उत्साह असताना सायंकाळच्या वेळी महावितरणच्या विजेच्या लपंडावामुळे गणेशभक्तांची चांगलीच गैरसोय झाली. घराघरांत तसेच गणेश मंडळांमध्ये पूजनाची तयारी सुरू असतानाच वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांनी महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.


गणेश चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी पूजनाचा मुहूर्त साधण्यासाठी भाविकांची लगबग सुरू होती. मात्र, त्याचवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने अनेक ठिकाणी पूजनाच्या तयारीत अडथळे निर्माण झाले. गणरायाच्या आगमनाचा आनंदोत्सव सुरू असताना विजेच्या लपंडावामुळे भाविकांचा हिरमोड झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.


‘सण-उत्सव सुरू झाले कीच वीजपुरवठ्याचा लपंडाव का?’ असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एरवी वीजपुरवठा सुरळीत असतो; मात्र हिंदू सण-उत्सवांच्या काळात विशेषतः सायंकाळच्या वेळी वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याने महावितरणने याकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी होत आहे.



दरम्यान, आगामी गणेशोत्सवाचे पुढील १० ते १२ दिवस शहरात मोठ्या उत्साहात कार्यक्रम होणार आहेत. या काळात गणेश मंडळांच्या मिरवणुका, आरती, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने महावितरणने वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
वीजपुरवठ्याचा लपंडाव असाच सुरू राहिल्यास महावितरणला गणेशभक्तांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही काही गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

