नांदेड, अनिल मादसवार | नांदेड-भोकर मार्गावरील सिताखंडी घाटात सातत्याने होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेत, अपघातांना आळा घालण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.


सिताखंडी घाटातील तीव्र वळणे, ब्लाईंड स्पॉट्स तसेच अतिवेगाने धावणारी वाहने यामुळे प्रवाशांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अपघातप्रवण ठिकाणी तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे आ. चव्हाण यांनी पत्रात नमूद केले आहे.


घाटातील सर्व अपघातप्रवण क्षेत्रे आणि ब्लाईंड स्पॉट्सवर वाहनचालकांना स्पष्टपणे दिसतील असे मोठे धोक्याचे इशारा फलक लावण्यात यावेत. तसेच धोकादायक वळणांवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी रबर स्ट्रिप्स बसवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.



स्पीड गन कॅमेरे आणि कठोर कारवाई – अतिवेगाने वाहन चालविणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी घाट परिसरात स्पीड गन सुविधेचे कॅमेरे बसवावेत. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही आ. श्रीजया चव्हाण यांनी केली आहे. घाटातील वाहतुकीवर चोवीस तास लक्ष ठेवण्यासाठी सिताखंडी घाट परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्यात यावी, अशी महत्त्वाची मागणीही पत्रात करण्यात आली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेचा हा अत्यंत संवेदनशील प्रश्न असून, अपघातांमुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून पोलीस अधीक्षक स्तरावरून तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, असे आवाहन आ. श्रीजया चव्हाण यांनी केले आहे.

