Homeनांदेडहिमायतनगरात जल्लोषात गणरायाचे आगमन, गणेशभक्तांचा उत्साह ओसंडला

हिमायतनगरात जल्लोषात गणरायाचे आगमन, गणेशभक्तांचा उत्साह ओसंडला

ढोल-ताशांचा गजर अन् ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष; रात्री उशिरापर्यंत गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना

हिमायतनगर, अनिल मादसवार | गणेश चतुर्थीच्या मंगलमय पर्वानिमित्त हिमायतनगर शहरात लाडक्या गणरायाचे जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. शहरातील विविध गणेश मंडळांनी मोठ्या उत्साहात गणेशमूर्ती स्थापना स्थळी नेऊन रात्री उशिरापर्यंत विधिवत प्राणप्रतिष्ठापना केली.

गणेश चतुर्थीनिमित्त सकाळपासूनच हिमायतनगरच्या बाजारपेठेत बालगोपाल, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गणेशोत्सवासाठी बाजारपेठेत विविध आकारांच्या गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य, पूजासाहित्य, फळे आदींची दुकाने सजली होती.

शहरासह ग्रामीण भागातील गणेश मंडळांचे पदाधिकारी सकाळपासूनच गणरायाला घेण्यासाठी शहरात दाखल झाले होते. आपल्या लाडक्या बाप्पाला ट्रक, ऑटो, जीप, हातगाडी, दुचाकी यासह उपलब्ध होईल त्या वाहनातून मोठ्या आनंदात स्थापना स्थळी घेऊन जाताना गणेशभक्त दिसून आले.

श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणपतीची स्थापना – हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणपतीची सायंकाळी ५ वाजता पुरोहित कांता गुरु वाळके यांच्या मंत्रोच्चारात विधिवत स्थापना करण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात भाविकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

दरम्यान, शहरातील कुलस्वामिनी माता कालिका मंदिरात स्थापना करण्यात येणाऱ्या गणेशमूर्तीची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शहराचे उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार यांच्यासह युवक व गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पोलीस बंदोबस्तामुळे मिरवणुका शांततेत – गणरायाचे आगमन शांततेत व सुव्यवस्थेत व्हावे, यासाठी पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख चौक व गर्दीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मिरवणुकांदरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी वाहतूक व्यवस्थाही सुरळीत ठेवली.

गणरायाच्या आगमनाने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, आगामी अकरा दिवस गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे. विविध गणेश मंडळांकडून धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याने शहरात उत्सवाचे वातावरण कायम राहणार आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments