नांदेड, प्रतिनिधी | नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०२३ मध्ये घडलेल्या बॅग लिफ्टिंग प्रकरणातील तब्बल तीन वर्षांपासून फरार असलेल्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने तेलंगणातील बासर येथून अटक करत आणखी ₹५,००,३०० किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे जुन्या गुन्ह्याचा उलगडा करण्यास पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.


२ ऑगस्ट २०२३ रोजी प्रशांत प्रभाकर डहाळे यांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने व मौल्यवान ऐवज चोरीला गेल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यापूर्वी या प्रकरणात दोन आरोपींना अटक करून सुमारे ₹१३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. मात्र, उर्वरित तीन आरोपी फरार होते.


पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या विशेष सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा सातत्याने शोध घेत होते. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि विविध राज्यांमध्ये शोधमोहीम राबविल्यानंतर आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.



आरोपी ओडिशातून तेलंगणातील बासर येथे आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून औला गंगा औला रामुल (४०), कंचना दास येशु दास (४०) आणि चिनबाबू रामू प्रधान (२३) या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून ₹५.०३ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने, नांदेड ग्रामीण पोलीस व सायबर सेलच्या संयुक्त सहकार्याने यशस्वीरीत्या पार पाडली.

