Relief For Flood Victims : नांदेड शहरातील पूरग्रस्तांना दिलासा ; सीटू संघटनेचे फॉर्म स्वीकारण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र

नांदेड| १५-१६ ऑगस्ट रोजी नांदेड शहरात झालेल्या अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या अर्जदारांचे अर्ज स्वीकारून तातडीने गृह पंचनामे करून सानुग्रह अनुदान वाटप करावे ही मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाने पूर्णतःवास नेण्याच्या दृष्टीने दि.२८ ऑगस्ट रोजी लेखी पत्र काढले असून सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियन या संघटनेस यश आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने सदरील पत्र मनपा आयुक्त, उपविभागीय अधिकारी नांदेड व तहसीलदार नांदेड यांना वर्ग केले आहे.


नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका यावर्षी पीडित पूरग्रस्तांचे अर्ज स्वीकारण्यास विरोध करीत होती. नांदेड शहरात साधारणतः ६ ते ७ लाख लोकांचे,नागरिकांचे वास्तव्य असून नदी काठावर, नाल्याच्या काठावर, सखल भागात, कच्च्या घरात व नादुरुस्त घरात राहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.


जिल्ह्यात व शहरात १३३ ते १४० मिलिमिटर पाऊस पडल्याची नोंद असताना देखील यावर्षी पीडित अर्जदारांचे अर्ज मनपाच्या वतीने स्वीकारले जात नव्हते. म्हणून दि. १८ ऑगस्ट रोजी भव्य मोर्चा व २६ ऑगस्ट रोजी सीटू कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली.त्या आंदोलनाची दखल जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली असून अर्जदारांच्या घरी जाऊन गृह पाहणी करून पंचनामे करण्याचा व सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


सीटू संघटनेच्या संघर्षशील लढ्यामुळे गेल्यावर्षी २०२४ मध्ये जवळपास २० कोटी रुपये पूरग्रस्तांना अनुदान स्वरूपात मंजूर करण्यात आले होते. दहा हजार रुपये प्रत्येकी अनुदान मंजूर झाले असल्यामुळे २० हजार पूरग्रस्तांची जम्बो यादी मनपा व तहसील कार्यालयाने तयार केली होती परंतु बहुतांश अर्ज सादर केलेल्या पीडितांचे नावे पात्र यादीत नसल्याने सीटू, माकप व जमसंच्या वतीने तीव्र आंदोलने करून आक्षेप घेण्यात आला होता. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सीटूच्या मागणीची दखल घेत सर्वच १४ ते १५ हजार पूरग्रस्तांचे सानुग्रह अनुदान रोखून ठेवले होते. आजघडीला फॉर्म दाखल होत असल्यामुळे खरे पूरग्रस्त सिद्ध होणार आहेत व मागील थकीत अनुदान देखील या पडताळणी मध्ये व पाहणी मध्ये तपासणी करून वाटप होण्याची शक्यता आहे. -कॉ.गंगाधर गायकवाड, अध्यक्ष – नांदेड जिल्हा मजदूर युनियन संलग्न सिटू.
सन २००६ व २०२३-२४ मध्ये देखील सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांच्या मागणी नुसार व आंदोलनामुळे सानुग्रह अनुदान व रेशन किट मिळाल्याचा इतिहास आहे.

सद्यस्थितीत सीटू संघटनेच्या वतीने फॉर्म भरणे सुरु असून मागील वर्षी पात्र असणाऱ्या शहरातील सर्व पूरग्रस्तांनी देखील फॉर्म भरून आपले मंजूर अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न करावेत. यावर्षी २० हजार रुपये व ५० किलोग्रॅम ची १४ जीवनावश्यक वस्तूंची किट पूरग्रस्तांना देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.जे खरे नुकसानग्रस्त आहेत त्यांनी सीटू कार्यालय एमजीएम कॉलेज समोर प्रियदर्शीनी शाळे जवळ नांदेड येथे फॉर्म भरून अनुदान देण्याची मागणी करावी अन्य इतरांनी फॉर्म भरू नयेत असे आवाहन सीटू संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेल्या पत्रामध्ये मागील वर्षीचे २०२४ चे मंजूर अनुदान वाटप करावे अशी देखील विनंती करण्यात आली आहे आणि लवकरच अनुदान वाटप करण्याची कार्यवाही होणार असून तातडीने अनुदान देण्यात यावे ह्या मागणी साठी तहसील कार्यालय येथे मोठे आंदोलन करण्याचा मानस सीटू कामगार संघटनेचा आहे असे सीटूचे जनरल सेक्रेटरी तथा मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.



