नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

नांदेड l नांदेड ते बिदर हा बहुप्रतिक्षित नवीन रेल्वे मार्ग कर्नाटकातील विद्यमान राज्य सरकारकडून मंजुरी न मिळाल्यामुळे रखडला असून, हा प्रश्न कर्नाटक विधानसभेच्या येत्या अधिवेशनात मांडणार असल्याचे आश्वासन कर्नाटकचे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार बी. वाय. विजयेंद्र यांनी दिले आहे. माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी हे स्पष्ट केले.

नांदेड येथे ५ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या जगद्गुरु केदार पीठाधीश्वर श्री श्री श्री १००८ भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पट्टाभिषेक रजत महोत्सव व विश्वशांती महायज्ञ सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आ. बी. वाय. विजयेंद्र यांचे सोमवारी सकाळी शहरात आगमन झाले. यानिमित्ताने त्यांनी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

या भेटीवेळी वरिष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी तसेच नांदेड जिल्हा रेल्वे समितीचे सचिव व वरिष्ठ पत्रकार शंतनू डोईफोडे उपस्थित होते. याप्रसंगी खा. अशोकराव चव्हाण यांनी नांदेड–बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, केंद्र व राज्य सरकारांच्या ५०:५० खर्च भागीदारीतून हा प्रकल्प राबविण्यास केंद्र सरकारने संमती दिली आहे.

त्यानुसार महाराष्ट्रातील भाजप सरकारने या रेल्वे प्रकल्पातील आपल्या हिस्स्याचा खर्च उचलण्याबाबत मंत्रिमंडळ निर्णय घेतला आहे. मात्र, कर्नाटक राज्य सरकारकडून अद्याप या प्रकल्पासाठी खर्चाची जबाबदारी स्वीकारण्यास मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा महत्त्वाचा प्रकल्प रखडल्याची खंत व्यक्त करून खा. अशोकराव चव्हाण यांनी आ. बी. वाय. विजयेंद्र यांना कर्नाटक राज्य सरकारच्या पातळीवर तसेच कर्नाटक विधानसभेत हा विषय प्रभावीपणे मांडण्याची मागणी केली. संजीव कुलकर्णी व शंतनू डोईफोडे यांनीही या चर्चेत आपल्या सूचना मांडल्या.

हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास नांदेड येथील श्री हजूर साहिब आणि बिदर येथील नानक झिरा साहिब ही दोन अत्यंत महत्त्वाची शीख तीर्थक्षेत्रे थेट रेल्वे मार्गाने जोडली जाणार आहेत. त्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणावर सोय होणार असून, पर्यटन, व्यापार व रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. तसेच नांदेड ते बंगळुरू दरम्यानचे रेल्वे अंतरही लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.

नांदेडकरांच्या भावना लक्षात घेऊन आ. बी. वाय. विजयेंद्र यांनी कर्नाटक विधानसभेच्या येत्या अधिवेशनात नांदेड–बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचे आश्वासन दिले. या भेटीच्या वेळी आ.श्रीजया चव्हाण, दक्षिण बिदरचे भाजप आमदार डॉ. शैलेंद्र बेलदळे, बिदर जिल्हा भाजप अध्यक्ष सोमनाथ पाटील, बंगळुरू शहरातील भाजप नेते सिद्धेश, नांदेड महानगरपालिकेतील भाजप गटनेते अ‍ॅड. महेश कनकदंडे, किशोर स्वामी आदी उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button