कंधार, सचिन मोरे| कंधार लोहा मतदारसंघामध्ये मागील आठवड्यात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. लोकप्रतिनिधी व आघाडी सरकार निष्क्रिय असून अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे अवघड झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना एकरी २५ हजाराची नुकसान भरपाई द्या अन्यथा वेगळा विचार करावा लागेल असा गर्भित इशारा महाराष्ट्र राज्य समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी दिला.



महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ३ सप्टेंबर रोज बुधवारी सकाळी ठीक ११ वाजता धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्याची सुरुवात भुईकोट किल्ला कोटबाजार – मोठी दर्गा – गांधी चौक – कापड लाईन- शिवाजी चौक- आंबेडकर पुतळा यामार्गाने वाजत गाजत, नारे देत उपविभागीय कार्यालयालावर धडकला. पुढे या मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले यावेळी एम.आर.एसचे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, ज्येष्ठ नेते दत्ताजी पवार, छावा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डी.जी.पाटील जाधव नंदनवनकर,माजी.जि.प.उपाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे, युवा नेते शिवराज धोंडगे, शिवाजी पाटील धानोरकर,व्यंकट भालेराव, प्रभाकर आढाव, प्रताप धोंडगे, सुभाष मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.



मोर्चेकरांना मार्गदर्शन करताना शंकरअण्णा धोंडगे म्हणाले की, कंधार लोहा मतदारसंघांमध्ये २८ व २९ ऑगस्ट रोजी ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने थैमान घातले त्यामुळे शेतकऱ्यांचे उभी पिके, गुरे ढोरे, कडबा वाहून गेला. नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या, गावागावात घराघरामध्ये पाणी घुसल्यामुळे संसार उपयोगी वस्तू नष्ट झाल्या, एवढी मोठी अतिवृष्टी मागच्या ७० वर्षात झाली नाही. ही अस्मानी व सुलतानी संकटे शेतकऱ्यांच्याच पाचवीला पुंजलेले आहेत. या अतिवृष्टीमुळे मतदार संघातील शेतकरी अक्षरशः नागावला गेला आहे. त्यांच्याकडे काहीच राहिले नाही माझ्या काळात देखील मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली होती.त्यावेळी मी मतदारसंघातील शेतकऱ्यांना दोन आठवड्यातच मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळून दिलेली होती.



आपल्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी व अधिकारी बेजबाबदार असून ते फोटो काढण्यातच गुंग आहेत. कोरडा पुळका करू नका, फोटो सेशन बंद करा तात्काळ मदतनिधी उपलब्ध करून द्या माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढतच राहणार अशी ग्वाही माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी यावेळी दिली.



