कंधार, सचिन मोरे| तालुक्यात २७ ऑगस्टच्या रात्री पासून २८ ऑगस्टच्या संध्याकाळ पर्यंत पावसाने रौद्ररूपधारण केले असून यामुळे तालुक्यातील २८ गावात पाणी शिरले आहे. सहा जनावरे पुराच्या पाण्याने वाहून गेले आहेत. तर जाकापुर व भिकमारी ही दोन गावे पुराच्या पाण्याने वेढले गेले आहेत. त्याच बरोबर २१ गावाचे पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील बहाद्दरपुरा येथील पुलावरून मन्याडीचे पाणी वाहत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


आठ दिवसापूर्वी तालुक्यासह जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली येऊन बाधित झाली होती. यात शेतकऱ्यांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले होते. ती परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच बुधवारी रात्री पासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. बघता बघता पावसाने रौद्ररूप धारण केले. यात चिखली, आलेगव,काटकळंबा, बारुळ, चौकी धर्मापुरी, सावळेश्वर, हळदा, कौठा, वरवंट,येलूर पेठवडज,कळका, नंदनवन, शिरूर, यासह २८ गावात पुराचे पाणी शिरले असून कुरुळा व दिग्रस येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली.

गोणार व पेठवडत या मन्याड नदी काटच्या गावातील घरामध्ये पाणी शिरल्यामुळे दहा बारा घरातील नागरीकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था प्रशासनाच्य वतीने करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक गावात पाणी शिरल्याने अनेक घरांची पडझड झाली आहे. अनेक भागात लहान मोठी पुल व रस्ते खरडून गेल्यामुळे दळणवळणचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुराच्या पाण्यामुळे मण्याड नदी काठावरील दोन्ही बाजूची शेती व शेतीतील उभी पिके खरडून वाहून गेली. यामुळे शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर शेती पाण्यामुळे बाधित झाली आहे.


घरातून कोणीही बाहेर पडू नये – आ. चिखलीकर
कंधार तालुक्यात पावसाने थैमान घातल्यामुळे अनेक गावात पुराचे पानी शिरल्यामुळे तालुक्यातील शेतीचे उभे पिके पाण्याखाली गेल्याने कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले आहे. अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचा संपर्क तुटलेला आहे. नागरिकांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. कामा व्यतिरिक्त घरा बाहेर पडू नये.बाधित क्षेत्राच्या बाबतीत मी कंधार तालुक्यात सर्वत्र लक्ष ठेवून असून प्रशासनास दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
नगिकांनी दक्ष राहावे – उपविभागीय अधिकारी गोरे
दोन दिवसापासून सतंत धार पावसामुळे बारूळ लिंबोटी धरण व जग तुंग तलाव तसेच तालुक्यातील अनेक छोटे मोठे तलाव पूर्ण शमतेने भरले आहे. लिबोटी धरण पूर्ण भरल्याने धरणाची १५ दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातून ८० क्युसेस गतीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बहाद्दरपुरा येथील पुलावरून पाणी जात आहे. या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तालुक्यातील २१ पुलावरून पुराचे पाणी जात असल्याने नागरिकांनी दक्ष राहावे. आपल्या जीवाची काळजी घ्यावी,कामा शिवाय घराबाहेर पडू नये. असे आव्हान विभागीय अधिकारी तथा तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी केले.


