Crime patrol : सर्पमित्र की ड्रग्स डॉन? सोशल मीडियावरची ओळख निघाली बनावट

अहिल्यानगर, प्रतिनिधी| सोशल मीडियावर स्वतःला सर्पमित्र, पर्यावरणप्रेमी व समाजसेवक म्हणून सादर करत लाखो लोकांचा विश्वास संपादन करणारा युट्यूबर आकाश जाधव अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. सापांचे रेस्क्यू दाखवून लोकप्रियता मिळवणाऱ्या या युट्यूबरमागे कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थांचे काळे साम्राज्य दडले असल्याचा धक्कादायक पर्दाफाश छत्तीसगडच्या महासमुंद जिल्हा पोलिसांनी केला आहे.

7 जानेवारी रोजी कोमाखान पोलिसांनी संशयावरून थांबवलेल्या एका रुग्णवाहिकेत तपासादरम्यान तब्बल 5 क्विंटल 20 किलो गांजा आढळून आला. या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 2 कोटी 60 लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे, रुग्णवाहिकेचा वापर करून चेकपोस्ट सहज पार करण्यासाठी गांजाची तस्करी केली जात होती, ही बाब तपासात उघड झाली आहे.

या प्रकरणाच्या चौकशीतून आकाश जाधव (रा. अहिल्यानगर, महाराष्ट्र) याचे नाव या गांजा तस्करी रॅकेटचा मास्टरमाइंड म्हणून पुढे आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा गांजा ओडिशातून थेट महाराष्ट्रात आणला जात होता. गेल्या एक वर्षात 6 ते 7 वेळा मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक झाल्याची शक्यता असून, पुणे शहरातील बाजारपेठेत पुरवठा करण्याचा डाव असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे संपूर्ण रॅकेट सापांच्या रेस्क्यूच्या नावाखाली आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धीच्या आडून चालवले जात होते.

या कारवाईत अँटी नारकोटिक्स टास्क फोर्स आणि कोमाखान पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली असून, यामध्ये घाऊक विक्रेते, वाहतूक करणारे आणि किरकोळ पुरवठादार यांचा समावेश आहे.
जर ही वाहतूक वेळेत अडवली नसती, तर पुणे व आसपासच्या भागातील तरुणाईवर गंभीर परिणाम झाले असते, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

लाईक्स, फॉलोअर्स आणि झगमगत्या ओळखींच्या आड किती भयावह सत्य दडलेले असू शकते, याचे हे प्रकरण जिवंत उदाहरण ठरत आहे. उल्लेखनीय म्हणजे, आकाश जाधवच्या यूट्यूब चॅनेलला सुमारे 56 लाखांहून अधिक सब्सक्राइबर्स तर इन्स्टाग्रामवर 3 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स होते. सर्पमित्र म्हणून ओळख निर्माण करणारा हा चेहरा आता अमली पदार्थ तस्करीच्या गंभीर गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यात आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button