Rahul Kardile : पुस्तकामुळेच माणूस घडतो – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड| माणसांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची खरी ताकद पुस्तक वाचनात असते. केवळ कायदे किंवा नियमांच्या आधारे समाजात बदल घडत नाहीत; ते स्वयंप्रेरणेनेच घडतात. त्यामुळे प्रत्येकाने वाचनाची सवय जोपासणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

नांदेड ग्रंथोत्सव 2025 च्या समारोप प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अच्युत बन होते. व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, जिल्हा कोषागार अधिकारी विक्रम देशमुख, शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी, ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी, निरीक्षक प्रताप सूर्यवंशी, राजेंद्र हंबीरे, गोविंद वडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कर्डिले म्हणाले की, लहानपणापासून मला वाचनाची आवड आहे. पुस्तकावर केलेली गुंतवणूक आयुष्यात खूप काही देऊन जाते. लेखक आपल्या लेखनातून एकाच वेळी हजारो लोकांशी संवाद साधतात. त्यामुळे सर्व भाषांतील पुस्तके वाचण्याची सवय लावली पाहिजे. मराठी भाषेला समृद्ध असा साहित्यिक वारसा लाभला आहे. मोबाईलच्या युगात वाचन करणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखे आहे; मात्र हे आव्हान स्वीकारणे आवश्यक आहे.

कामाच्या व्यापातूनही वाचनाची सवय कायम ठेवत असल्याचे सांगत त्यांनी सध्या सेतुमाधव पगडी लिखित आणि कै. नरहर कुरुंदकर यांच्या प्रस्तावनेचे ‘छत्रपती शिवाजी’ हे पुस्तक वाचत असल्याचे सांगितले. तसेच या कार्यक्रमाला शासकीय सोपस्कार म्हणून नव्हे, तर एक वाचक आणि ग्रंथप्रेमी म्हणून उपस्थित राहिल्याचे त्यांनी नमूद केले. वाचन चळवळ वाढविणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनी शाळांमधील विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करावी, असे मत व्यक्त केले. माजी जि.प. अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे यांनी ग्रंथालयीन कर्मचारी अत्यंत कमी मानधनावर काम करत असून त्यांचे मानधन वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच ग्रंथालय क्षेत्रातील अडचणी सोडविण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमात जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे व राजेंद्र हंबीरे यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष डॉ. अच्युत बन यांनी मराठी भाषेचा वापर वाढविण्याचे आवाहन करत ‘बन साहित्य प्रतिष्ठान’च्या वतीने गेल्या पंचवीस वर्षांपासून साहित्यिक पुरस्कार दिले जात असल्याची माहिती दिली. वाचनाच्या आवडीमुळे जागतिक साहित्य संमेलन व इतर कार्यक्रमांसाठी आतापर्यंत ५५ देशांना भेट दिल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी ग्रंथोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्यांचा तसेच वाचकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंद फाजगे यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रकांत तघडफल्ले यांनी केले, तर आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनी मानले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button