किनवट, परमेश्वर पेशवे l आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके महाराष्ट्र शासनाचा सर्व विभागाच्या योजनांचा शंभर दिवसात विकास कृती आराखडा तयार करण्याच्या हेतुने शेवटचा माणूस केंद्रबींदू माणून एकही घटक योजनांपासून वंचित राहाणार नाही. यासाठी अशा आढावा बैठका घेण्यात येत असल्याचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री प्रा.डाॅ.अशोक उईके यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितले. १५ फेब्रुवारी रोजी मंत्री उईकेंचा किनवट दौरा होता. दरम्यान किनवट स्थित उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.


यावेळी आमदार भीमराव केराम, हदगावचे आमदार बाबूराव कदम कोहळीकरांची उपस्थिती होती. दरम्यान आदिवासी विद्यार्थ्यांसह आदिवासी शेतकर्यांच्या समस्या घेऊन व्हाॅईस आँफ मीडिया किनवटच्या पत्रकारांनी मंत्री उईकेंना निवेदन दिले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवटच्या कार्यकक्षेतील गोकुंदा येथिल “भरती पूर्व पोलीस दल/सैन्य दल/ सुरक्षा गार्ड” प्रशिक्षण केंद्र अस्तित्वात नाही. परंतू जवळपास दोन वर्षापासून इमारत भाडे चालू आहे.

संबंधित यंत्रणेने ही बाब प्रकल्पाधिकार्यांच्या समोर आणली कि परस्पर विल्हेवाट लावली याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी मंत्र्यांकडे प्रश्न उपस्थित केला. आदिवासींच्या अनाधिकृतरित्या बळकावलेल्या जमिनी आदिवासींना परत मिळाव्यात यासाठी तत्कालीनचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी एस.कार्तीकेयन यांनी आदिवासींना आवाहन केले होते. त्यावरुन शेकडो आदिवासी शेतकर्यांनी निवेदने दाखल केलीत.

परंतू त्याच दरम्यान त्यांची बदली झाली आणि शेतकर्यांच्या प्रश्नांवर पडदा पडला तो आजही कायम आहे. म्हणून आदिवासी शेतकर्यांचा प्रश्नही मार्गी लावण्याचा मुद्दा मांडला अनुसूचित जनजाती पडताळणी किनवटचे कार्यालय छ.संभाजीनगरला आहे, ते किनवटला कार्यान्वित करावे. आदिवासींचे किनवट येथिल वाहन चालक प्रशिक्षण कार्यालय नांदेडला आहे ते परत किनवटला द्यावे.
आश्रमशाळा, वसतीगृहाला भाजीपाला, केळी, अंडी व भोजन पुरवठ्याची कामे बाहेरच्यांना देण्यात आलीत, ती रद्द करुन स्थानिक आदिवासी बेरोजगारांना प्राधान्याने देण्यात यावे. स्पर्धात्मक परिक्षापूर्व तयारीसाठी किनवटात आधुनिक प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करावे. यासह अन्य मुद्यांचे निवेदन सादर केले.