नवीन नांदेड l नांदेड येथे श्री गुरू गोविंद सिंग अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात, विदयार्थी विज्ञान मंथन (VVM)२०२४-२५ परीक्षा संपन्न झाली.
8 डिसेंबर रोजी नांदेड येथील श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विज्ञान मंथन या परीक्षेची राज्य स्तरीय शिबिर/कॅम्प अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने घेण्यात आला.
विद्यार्थी विज्ञान मंथन ही स्पर्धा परीक्षा एन.सी.ई.आर.टी. एन.सी.एस.एम.व विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता सहावी ते अकरावी मधील विद्यार्थ्यां करिता घेण्यात येते. विज्ञान विषयात रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर मार्गदर्शन मिळावे व संशोधनामध्ये रुची निर्माण व्हावी यासाठी ही परीक्षा घेण्यात येते.याची प्रथम फेरी ही दिनांक २३ व२७ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन माध्यमातून पार पडली.त्यात संपूर्ण देशात १.५ लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दिली.कोकण,पश्चिम महाराष्ट्र, देवगिरी व विदर्भ या चार विभागातील प्रत्येक इयत्तेतील वीस याप्रमाणे विद्यार्थ्यांची राज्य स्तरीय शिबिरा साठी निवड करण्यात आली.
देवगिरी प्रांतातील पात्र एकूण १२४ विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक तसेच प्रकल्प अभ्यास याची चाचणी व कॅम्प काल श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता.या कॅम्पमधुन प्रत्येक इयत्ते मधुन दोन अशी एकूण बारा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
यावेळी पालकां करिता डॉ अजय महाजन,श्रीनिवास औंधकर,डॉ.रंजन गर्गे यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानां मधून नवीन शैक्षणिक धोरण, भारताचा भविष्यातील अंतराळ संशोधन कार्यक्रम व भारताचा वैज्ञानिक इतिहास या विषयावर पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरामधे डॉ.उपेंद्र कुलकर्णी, संचालक डॉ.मनेश कोकरे,विद्यार्थी विज्ञान मंथन महाराष्ट्र समन्वयक श्री.सुभाष पाटील , विविमं परिक्षेचे राष्ट्रीय परिक्षा निरिक्षक श्याम बारडकर यांची विशेष उपस्थिती होती.
शिबिराच्या यशस्वितेसाठी, डॉ .किरण सानप आणि SGSS अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शिक्षकवृंद ,कर्मचारी आणि विद्यार्थी तसेच विज्ञान भारतीचे स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतली.