श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारकडून जनतेला आकर्षित करण्यासाठी विविध योजनांच्या घोषणाचा पाऊस पाडल्या जात आहे. परंतु, राज्य शासनाकडुन जाहीर करण्यात आलेल्या यातील बहुतांश योजनांची अमलबजावणी मात्र म्हणावे त्या प्रमाणात प्रभावी पणे व दिलेल्या मुदतीत होत नसल्यामुळे योजनेस पात्र लाभार्थ्यांची उपेक्षा भंग होत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे येत आहे.
केंद्र शासनाकडून सोयाबीन व कपाशीच्या हमी भावातील तफावत दुर करण्याच्या दृष्टीने राज्यातील शेतकऱ्याना प्रती हेक्टरी ५००० रुपये एवढी रक्कम देण्याचे मागील बऱ्याच दिवसा पूर्वी जाहीर करण्यात आले होते. यावर राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषीमंत्री यांनी या संदर्भात अनुदान वाटपाची डेडलाईन देखील जाहीर केली होती. त्यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे लक्ष या अनुदानाच्या रक्कमेकडे लागले होते. परंतु अद्याप ही जाहीर करण्यात आलेली अनुदानाची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली नाही.
तसेच मागील बऱ्याच महिन्यापूर्वी राशनधारकासाठी आनंदाचा शिधा ही योजना राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली होती. सदर योजनेचा लाभ राशन कार्ड धारकांना मागील काळात सणासुदीच्या दिवसात देण्यात आला होता. त्याच धर्तीवर देण्यात येणारा आनंदाचा शिधा गणेश चतुर्थीच्या निमित्ताने दिल्या जाणार असल्याचे राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आले होते. परंतु गणेश चतुर्थीसह गौरी पूजन देखील पार पडले असताना देखील पात्र राशन कार्ड धारकांना अद्यापही आनंदाचा शिधा मिळालाच नसल्याने जनतेमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.
सण आला दारात, शिधा पोहोचला नाही घरात
गौरी गणपती उत्सव संपला तरी रास्त दुकानात अद्यापही शिधा संच वेळेपर्यंत पोहोचला नसल्याने गरिबांच्या घरात गोडधोड करता आले नाही. तसेच सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्याने लाडक्या बहिणींना ओवाळणी देण्याच्या आनंदात सरकारला आनंदाचा शिधा देण्यात विसर तर पडला नाही ना ? असाही प्रश्न उपस्थित केला गेला असून “सण आला दारात, शिधा पोहोचला नाही घरात” अशी म्हणण्याची वेळ आली आहे.