श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहरे| निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम थांबवा व गावे न बुडवता प्रकल्प कसा करता येईल त्याचा अभ्यास करा.या सूचना देत निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना.देवेंद्रजी फडणीस यांनी जुलै महिन्यात मुंबई येथे निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाडाचे पदाधिकारी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्तीक बैठकीत पाटबंधारे विभागाला दिल्या होत्या मात्र प्रत्यक्षात या आदेशाची कुठेही अंमलबजावणी झाल्याचे दिसत नसून प्रत्यक्षात धरणाचे काम करण्याच्या हालचालींनी वेग घेतल्याने निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याच्या वतीने दिनांक २७ सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी १ वाजता कापेश्वर येथील कपिलेश्वर मंदिरावर निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीची अतिशय महत्त्वाची व तातडीची बैठक बोलाविण्यात आल्याचे निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने कळविले आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, विदर्भ मराठवाड्यातील ९५ गावातील दीड लाख लोकांना विस्थापित करून त्यांच्या रोजी रोटीवर नांगर फिरू पाहणाऱ्या राक्षसी निम्न पैनगंगा प्रकल्पाला गेल्या २७ वर्षापासून विदर्भ मराठवाड्यातील ९५ गावातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.मागील काही महिन्यापासून महाराष्ट्र शासनाने निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम मराठवाड्यातील खंबाळा येथे सुरू केले होते, ते काम निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी बंद पाडले तर अनेक वेळा परिस्थिती हे स्फोटक झाली होती.किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी पुढाकार घेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकल्पाला आपला विरोध असून हा प्रकल्प करणे सोयीचे नाही.

अशी भूमिका मांडली आणि मुंबई येथे अधिवेशन काळात पाटबंधारे विभाग व पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घडवून आणली,या बैठकीला उमरखेडचे आमदार नामदेवराव ससाने आणि केळापुर आर्णी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संदीप धुर्वे हे मुंबई येथील बैठकीला उपस्थित होते.

बैठकीमधे आमदार भीमराव केराम व धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रकल्पाला असलेला विरोध पाहता आणी ह्या प्रकल्पात बुडणाऱ्या ९५ पैकी आदिवासी पेसा झोन मधली ४६ गावे व या गावातील दीड लाख लोकांचे विस्थापन होणार असल्याने हा प्रकल्प व्यवहार्य नाही. हे समजून सांगण्याचा आमदार भीमराव केराम व धरण विरोधी संघर्ष समितीने उपमुख्यमंत्री यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या प्रकल्पात कोणालाही न बुडवता, कोणाचेही विस्थापन न करता जर पाणी मिळत असेल तर त्या पर्यायाचा विचार करण्याचे आदेश उपस्थित असलेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले व ह्या प्रकल्याचे सुरू असलेले सर्व प्रकारचे काम थांबविण्याच्या सुचनाही दिल्या होत्या परंतु प्रत्यक्षात निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम थांबलेले नाही.

हरित लवाद पुणे व औरंगाबाद उच्च न्यायालय येथे याचिका प्रलंबित असतानाही पाटबंधारे विभाग कामाची घाई करीत आहे तसेच अनुसूचित क्षेत्रामध्ये ग्रामसभांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला असून हा प्रकल्प नको त्याऐवजी साखळी बंधारे बांधून पीण्याच्या पाण्याची व सिंचनाची व्यवस्था करावी ही समितीची प्रमुख मागणी आहे. या मागणीला मा. उपमुख्यमंत्री यांनी ९ जुलै २०२४ च्या बैठकीत अधिकार्यानां आदेश दिले असतानाही प्रकल्पाचे काम सुरू करण्यामागे कुठला उद्देश आहे.
हे कळायला मार्ग नाही.प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील अठरा गावात पाटबंधारे विभाग व भुमी अभिलेख विभागाचे अधिकारी व कर्मचारी जाऊन तेथील कुटुंबाचे सर्वेक्षण करणे, शेतीची मोजणी करणे, ग्रामसभेचे ठराव प्रकल्पाच्या बाजूने घेण्यासाठी प्रयत्न करणे तसेच निम्न पैनगंगा प्रकल्पाचे मुख्य स्थळ खंबाळा येथे हेडक्वार्टरचे काम मोठ्या प्रमाणात सुरू केल्याने व राज्य सरकार निम्न पैनगंगा प्रकल्प थांबवण्याच्या दृष्टीने कोणतीही पावले उचलत नाही. हे लक्षात येताच निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने २७ सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी १ वाजता विदर्भातील कापेश्वर येथील कपिलेश्वरच्या मंदिरावर धरण विरोधी संघर्ष समितीच्यावतीने बुडीत क्षेत्रातील सर्व शेतकरी, शेतमजूर बांधवांची व कार्यकर्त्यांची अतिशय महत्त्वाची व तातडीची सभा बोलावली आहे.
या बैठकीला बुडीत क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप, प्रसिद्ध प्रमुख तथा संघटक सचिव व यवतमाळ जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर, कोषाध्यक्ष प्रल्हादराव गावंडे सर, सचिव विजय पाटील राऊत व बंडूसिंग नाईक, कायदेशीर सल्लागार एडवोकेट बालाजी येरावार व बाबु भाई फारूकी, डॉ. बाबा डाखोरे, डॉ.सुप्रिया गावंडे, विजय पाझारे, गुलाब मेश्राम, निलेश कुमरे, शेषराव मुनेश्वर, भगवतीप्रसाद तितरे इत्यादींनी केले आहे.