Tree stumps and plantations | जि.प.प्रा. शाळा इंदिरानगर शेलगाव येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न -NNL

नांदेड| जि.प.प्रा. शाळा इंदिरानगर शेलगाव ता. अर्धापूर येथे पर्यावरण जनजागृतीचा हेतू डोळ्यासमोर ठेवून वृक्षदिंडी व वृक्षारोपण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. पंढरपूरच्या वारीचा व दिंडीचा आदर्श डोळयासमोर ठेवून शाळेकडून नाविण्यपूर्ण वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.


याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी ‘वारकरी वेष’ परिधान करुन व वृक्षाचे रोपटे हाती घेऊन आम्ही पर्यावरण वारकरी, झाडे लावू घरोघरीच्या जयघोषात वृक्षारोपणाचा संदेश दिला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांच्या टोपीवरती लिहिलेल्या पर्यावरण वारकरी या मजकुराने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले व पर्यावरण रक्षणाचा मौलीक संदेश लोकांना दिला. यावेळी गावातील मुख्य रस्त्याने ‘वृक्षदिंडी’ काढण्यात आली. यामध्ये इंदिरानगर शेलगावचे सरपंच पंजाबराव राजेगोरे, कृतीशिल ग्रा.पं. सदस्य तथा शिक्षणप्रेमी नागरिक गजानन पांचाळ, शिक्षणप्रेमी व समाजसेवी नागरिक सुनिल घोडे, संदिप घोडे तथा ग्रामसेविका सौ. जाकापूरे मॅडम व इतर नागरिक व पालकांनी सहभाग घेतला.

यावेळी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरापुढे दोन झाडे व शाळेच्या परिसरात 40 झाडे अशी एकूण 150 झाडे लावून ‘झाडे लावा झाडे जगवा’ चा संदेश कृतीतून देण्यात आला. यामध्ये आवळा, बदाम, करंजी, कडूलिंब, सीताफळ, साग आदी झाडांचा समावेश आहे. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी गजानन सोनटक्के, केंद्रप्रमुख विनोद देशमुख यांंनी मार्गदर्शन केले तर मु.अ. सोळंके ए.जी., सहशिक्षक गायकवाड डी.टी., बैनवाड एम.एस. यांनी परिश्रम घेतले तसेच संजय घोडे व दिपक नरवाडे आदींनी सहकार्य केले.





