नांदेड| जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाची त्रैमासिक बैठक, जिल्हा समुदाय संसाधन समूह बैठक, जिल्हा एचआयव्ही-टीबी समन्वय समितीची बैठक (District AIDS Prevention and Control Department meeting concluded) जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषदेत पार पडली.


बैठकीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे न्यायाधीश तथा सदस्य सचिव शरद देशपांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील, जिल्हा आर.सी.एच.अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप जाधव, मनपा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. बडीयोद्दीन, शिक्षण अधिकारी सौ.फुटाणे, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी प्रतिनिधि, समाज कल्याण कार्यालय प्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, जिल्हा समुदाय संसाधन समूह (D-CRG) प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

खाजगी रक्त तपासणी केंद्रातून एचआयव्ही पॉजिटिव्ह आलेले रूग्ण आयसीटीसी केंद्रांना संदर्भित करण्याबाबत सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरवर सर्व गरोदर मातांची एचआयव्ही व गुप्तरोग तपासणी होईल यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत त्यांनी सूचित केले.


जिल्ह्यातील 17 आयसीटीसी केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यात एचआयव्ही व गुप्तरोग तपासणी केली जाते. सन 2024-25 मध्ये 18 ते 35 वयोगटात एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. तरुणाईला या रोगापासून दूर ठेवण्याकरिता आयसीटीसी समुपदेशकांमार्फत जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयात एचआयव्ही व गुप्तरोग जनजागृतीपर समुपदेशनाचा ड्राइव घेणार असल्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी सांगितले. जिल्ह्यातील एड्स रोगाबाबतची सांख्यिकीय वैशिष्ट्ये सन 2024-25 आणि मे 2025 पर्यंतचा सर्व डेटा पीपीटी माध्यमातून जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप अंकुशे यांनी समिती समोर सादर केला.
