in the court of Ajit Pawar ! : स्व.प्रदीप नाईकांचे शिलेदार अजित पवारांच्या दरबारात !

किनवट, परमेश्वर पेशवे| मतदार संघातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे वजनदार नेते स्वर्गीय माजी आमदार प्रदीप नाईकांचे एकनिष्ठ शिलेदार, किनवट/माहूर मतदारसंघातील पहिल्या फळीतील जेष्ठ कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी यांचे शिष्टमंडळ राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सर्वेसर्वा, विद्यमान उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मुंबई येथील दरबारात जाऊन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात भेट घेतली. परिणामी पक्षप्रवेश करणार काय ? असा कयास काढण्यात येत असून, किनवट माहूरच्या राजकीय वर्तुळात मात्र तर्क वितर्काला उधाण आले आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, किनवट/माहूर मतदारसंघात विरोधकाला तोडास तोड मतदान रुपी उत्तर देणारे नेते स्वर्गीय माजी आमदार प्रदीप नाईक हेच एकमेव होते. हे नाकारता येत नाही. त्यांच्या अचानकपणे जाण्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्षात शुकशुकाट पसरला, स्वर्गीय नाईकांचे हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांचा आधारवड हरपल्यामुळे सैरावैरा झाले होते. आता मतदारसंघात विरोधकच उरला नसल्याच्या भावना उमटू लागल्या होत्या परंतु स्वर्गीय नाईक साहेबांच्या धर्मपत्नी श्रीमती बेबीताई नाईक यांनी पक्षाची धुरा सांभाळावी व स्वर्गीय नाईकांनी मोट बांधलेल्या हजारो कार्यकर्त्यांचे व जनतेचे नेतृत्व स्वीकारावं असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होता.

तो मान्य करत शहरातील एन. के. गार्डन येथे पक्षाची बैठकही संपन्न झाली. दरम्यान हजारो हितचिंतका सहित हे सर्व पदाधिकारी यांनी बैठकीला उपस्थिती लावली होती.यातील अनेकांनी भावनाविवश होऊन व्यासपीठावरून आपली भावनिक मत मांडली.परंतु अचानक हे मोठ्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले त्यांची भूमिका कोणती? हे कळले नसले तरी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महायुतीमध्येच असलेले राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार हे स्वबळावर लढविणार का?असाही कयास करण्यात येत आहे.


सदर भेटीदरम्यान आमदार प्रताप पाटील चिखलीकर,आमदार विक्रम काळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक दिनकर दहिफळे, माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसांनी, किनवटचे माजी नगराध्यक्ष साजिद खान, किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राहुल नाईक, रोहिदास, अमजद भाई यांची सदर शिष्ट मंडळात उपस्थिती होती. मात्र काही दिवसातच भेटीचे कारण आणि त्यांची भूमिका स्पष्ट होणार आहे एवढे मात्र खरे..!




