नांदेड, अनिल मादसवार| राज्यामध्ये महायुती म्हणून विधानसभा निवडणुकीला आम्ही सामोरे गेलो. जनतेने प्रचंड बहुमत दिले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था ही निवडणुक नेत्यांची नसून कार्यकर्त्यांची आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा या सर्व निवडणुका महायुती म्हणूनच लढविल्या जातील. परंतु स्थानिक पातळीवरील नेत्यांना याबाबत वेगळी भूमिका घेण्याचा अधिकार असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना.चंद्रशेखर बावनकुळे (State President Chandrakant Bawankule ) यांनी आज नांदेड येथे केले.


येथील भक्ती लॉन्समध्ये आयोजित केलेल्या चार जिल्ह्यांच्या संघटन पर्व अंतर्गत आयोजित केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपिठावर भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण, परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आ.तुषार राठोड, आ.राजेश पवार, आ.श्रीजया चव्हाण, आ.जितेश अंतापूरकर, आ.तानाजी मुटकुळे, भाजपचे विभागीय संघटनमंत्री संजय कौडगे, कार्यक्रमाचे संयोजक व कार्यकारी महानगराध्यक्ष माजी आ.अमरनाथ राजूरकर, प्रदेश सचिव देविदास राठोड, चैतन्यबापू देशमुख, संतुक हंबर्डे, किशोर देशमुख, विजयाताई चव्हाण, मारोतराव कवळे गुरुजी, माणिक लोहगावे, विजय गंभीरे यांची व्यासपिठावर उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना ना.बावनकुळे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात भाष्य करतांना सर्वोच्च न्यायालय ओबीसी आरक्षणासाठी डेटा पाहिजे होता तो पूर्ण झालेला आहे. निवडणुकीची प्रक्रिया करायला 45 दिवस लागतात. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राज्य निवडणुक आयोग निवडणुका घेण्यास तयार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या निवडणुका महायुती म्हणून ताकदीने लढण्यासाठी सज्ज रहा. हे सांगतांनाच जर स्थानिक पातळीवर परिस्थिती वेगळी असेल त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा कल लक्षात घेवून स्थानिक नेतृत्व महायुतीत लढावे का स्वतंत्र लढावे या संदर्भात प्रदेश भाजपाला निर्णय कळवेल व त्यानंतरच या संदर्भात योग्य ती दिशा स्पष्ट करण्यात येईल.

भारतीय जनता पक्षाने राज्यामध्ये दीड कोटी सभासद नोंदणीचे लक्ष निर्धारित केले आहे. आत्तापर्यंत एक कोटी दहा लक्ष सभासद नोंदणी झाली आहे. उर्वरित 40 लक्ष सभासद नोंदणीचे उद्दीष्ट येणाऱ्या काळात आपण पूर्ण करणार आहोत. ज्या कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी सर्वाधिक नोंदणी केली त्यांनाच सत्तेचा लाभ देणार आहोत. कमीत कमी 100 सभासद नोंदणी केलेल्या पदाधिकाऱ्यालाच विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर बसविणार आहोत. 500 पेक्षा अधिक नोंदणी करणाऱ्यांनाच जिल्हा परिषद, नगर पालिका, महानगर पालिका निवडणुकीचे पक्षाकडून तिकिट दिले जाईल. भारतीय जनता पक्ष हा आपला पक्ष असून आता आपण आपल्या सन्मानासाठी आणि जनतेच्या हितासाठी काम करायचे आहे असेही त्यांनी यावेळी निक्षुण सांगितले.

पक्ष संघटन वाढविले तरच पद – खा.चव्हाण
भारतीय जनता पक्षात शिस्तीला आणि कामाला अनन्यसाधारण महत्व आहे. हा पक्ष जनतेसाठी 24 तास काम करणारा आहे. पक्षाने जे ध्येय आणि धोरण ठरवून दिली त्यावर प्रत्येक कार्यकर्त्याने चालले पाहिजे. राज्यामध्ये दीड कोटीचे सभासद नोंदणीचे पक्षाने उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. एक कोटीचा टप्पा कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे पूर्ण झाला आहे. उर्वरित 40 लक्ष सभासद नोंदणी करण्यासाठी जसे राज्य पातळीवरील नेते प्रयत्नशील आहेत तसे कार्यकर्त्यांनीही आळस न करता अंग झटकून काम केले पाहिजे. ज्यांनी पक्ष संघटन वाढविण्यासाठी काम केले त्यांनाच पक्षात पद दिले जाईल व त्यांनाच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत संधी मिळेल. असे खडेबोल माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी ना.बावनकुळे यांच्यासमक्ष कार्यकर्त्यांना दक्ष केले.
यावेळी औसा, नायगाव, भोकर, किनवट, जिंतूर या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक सभासद नोंदणी केल्याबद्दल स्थानिक आमदार व त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन महानगराचे कार्यकारी अध्यक्ष माजी आ.अमरनाथ राजूरकर यांनी केले होते. त्यांच्या या नियोजनाचे ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी कौतूक केले. कार्यक्रमाचे प्र्स्ताविक विभागीय संघटनमंत्री संजय कौडगे यांनी केले.
अशोकराव चव्हाण यांचा उध्दव ठाकरेच्या शिवसेनेला हाबाडा
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे हवेत गेलेल्या महाविकास आघाडीचे विमान विधानसभा निवडणुकीत जनतेने जमिनीवर उतरविले. त्यानंतर महाविकास आघाडीतील काँग्रेससह सर्वच पक्षांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. त्यातच माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी उध्दव ठाकरेच्या शिवसेनेला आज चांगलाच हाबाडा दिला. लोहा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून निवडणुक लढविणारे उध्दव सेनेचे एकनाथ पवार व उध्दव सेनेचे निष्ठावंत पदाधिकारी माजी जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश देवून उध्दव सेनेला चांगलीच चपराक दिली आहे.