Tanda Samriddhi Yojana : हिमायतनगर तालुक्यात संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेतील कामावर गंभीर आक्षेप

हिमायतनगर, अनिल मादसवार| संत सेवालाल महाराज / लमाण तांडा समृद्धी योजनेअंतर्गत हिमायतनगर तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामात गंभीर अनियमितता व नियमबाह्य कारभार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाई तांडा (ता. हिमायतनगर) येथील शुभम लक्ष्मणराव जाधव यांनी पंचायत समिती हिमायतनगरचे गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार सादर करून सदर कामाचे पुढील देयके अदा न करण्याची व सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.


तक्रारीनुसार, तांडा समृद्धी योजनेअंतर्गत सुरू असलेले सी.सी. नालीचे काम प्रशासकीय मान्यता आदेशांचे पालन न करता बेकायदेशीरपणे सुरू आहे. अतिक्रमण न हटविता काम सुरू ठेवण्यात आले असून, काम सोबत जोडलेल्या अंदाजपत्रकानुसार केले जात नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण व प्रत्यक्ष स्थळावर समक्ष चौकशी झाल्याशिवाय कोणतेही देयक अदा करू नये, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.


तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, अंदाजपत्रकानुसार बांधायची असलेली नाली न बांधता दुसऱ्या ठिकाणी दोन वर्षांपूर्वी बांधलेली नाली फोडून नव्याने नाली बांधली जात आहे. विशेष म्हणजे, या कामात माती मिश्रित रेती वापरून निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारास पंचायत समितीच्या अभियंत्यांची मूक संमती असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.



शुभम जाधव यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर कामाची योग्य व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कामाचे सर्व देयके तात्काळ स्थगित ठेवावीत व चौकशी अहवालाची प्रत तक्रारदारास देण्यात यावी. अन्यथा, पुढील परिणामांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.


या तक्रारीची प्रत जिल्हाधिकारी नांदेड, प्रधान सचिव (ग्रामविकास व पंचायत राज विभाग) तसेच हदगाव बांधकाम विभागाचे उपअभियंता यांनाही माहितीस्तव पाठविण्यात आली आहे. तक्रारीसोबत स्थळ दर्शक नकाशा, ग्रामपंचायतीचा ठराव व अंदाजपत्रकाची प्रत जोडण्यात आली आहे. विकासाच्या नावाखाली जर सार्वजनिक निधीचा गैरवापर होत असेल, तर त्यावर तातडीने कारवाई होणे आवश्यक असून, प्रशासन या प्रकरणात काय..? भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



