Marathwada Liberation Day : मराठवाडा मुक्ती दिन आणि विस्मृतीतील जनआंदोलन

17 सप्टेंबर – मराठवाडा मुक्ती दिन, ही केवळ एक तारखेची नोंद नाही, तर ती मराठवाड्यातील जनतेच्या शौर्य, त्याग आणि अस्मितेचा ऐतिहासिक ठसा आहे. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाले, पण मराठवाडा भाग मात्र हैदराबादच्या निजामाच्या जुलमी राजवटीखाली अडकलेला होता. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात सामील झाले आणि मराठवाड्याला खरी स्वातंत्र्याची अनुभूती मिळाली.

मराठवाडा मुक्ती संग्राम : जनतेचा लढा – हा लढा फक्त काही नेत्यांनी किंवा संस्थांनी दिलेला नव्हता. हा जनतेचा लढा होता, रजाकारांच्या अत्याचाराच्या विरोधात उभा ठाकलेला हिंदू समाजाचा लढा होता. या लढ्याला ठोस नेतृत्व नव्हते, पण त्यात सामान्य माणसाचा असाधारण सहभाग होता. शेकडो गावांमध्ये भूमिगत चळवळी, सशस्त्र संघर्ष, गुप्त बैठका आणि प्रचार याच्या माध्यमातून जनता संघटित झाली होती. जर ही चळवळ, हे युद्धप्रयत्न न झाले असते, तर आजचा मराठवाडा वेगळा दिसला असता. मराठवाडा हा भारताचा भाग झाल्याची ग्वाही देणारा “पोलिस अ‍ॅक्शन” (ऑपरेशन पोलो) ही घटना केवळ सैनिकी कारवाई नव्हती, ती एका ऐतिहासिक जनआंदोलनाची परिणती होती.

विस्मरणात गेलेला संघर्ष
देशपातळीवर स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शाळा, महाविद्यालये, स्मारके, वार्षिक कार्यक्रम आणि विविध शासकीय उपक्रम राबवले जातात. परंतु त्या मानाने मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने अशा योजना फारशा राबवल्या जात नाहीत. शासन-प्रशासनाची उदासीनता जशी यासाठी जबाबदार आहे, तशीच समाजातील विचारवंत, अभ्यासक, इतिहासप्रेमी, आणि सामाजिक संस्था सुद्धा याला अपवाद नाहीत.

सगळ्यात गंभीर बाब म्हणजे, लोकांच्या दररोजच्या वापरातील दिनदर्शिकांमध्ये देखील 17 सप्टेंबरचा उल्लेख नाही. “कालनिर्णय” सारख्या लोकप्रिय पंचांगांमध्ये जिथे विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय दिवस नोंदवले जातात, तिथे मराठवाडा मुक्ती दिनाची अनुपस्थिती ही सांस्कृतिक दुर्लक्षाची लक्षणीय उदाहरण मानली पाहिजे.

कालनिर्णय आणि सामूहिक विस्मरण
“कालनिर्णय” हे फक्त पंचांग नाही, तर सांस्कृतिक माहितीचे आणि स्मरणशक्तीचे एक प्रभावी साधन आहे. या माध्यमातून लाखो घरांमध्ये कोणते दिवस महत्त्वाचे, स्मरणीय वा पूजनीय मानले जातात, हे ठरते. त्यामुळे या माध्यमातून एखाद्या ऐतिहासिक घटनेचा उल्लेख न होणे हे तिच्या सामाजिक महत्त्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. याचे अनुकरण करून अनेक धार्मिक संस्था स्वतःच्या परंपरांनुसार दिनदर्शिका प्रकाशित करतात. या सर्वांमध्ये मराठवाडा मुक्ती दिनाचा उल्लेख नसणे ही एक फार मोठी सांस्कृतिक विस्मृती आहे.

स्मृती जागृत ठेवण्याची गरज
सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान मराठवाडा मुक्तीत अनन्यसाधारण आहे. त्यांचे पराक्रमी निर्णय आणि “पोलिस अ‍ॅक्शन” यामुळेच हैदराबाद संस्थान भारतात सामील झाले. पण त्याचबरोबर स्थानिक स्वातंत्र्यसैनिक, चळवळी यांचे स्मरण आणि त्यांच्या कार्याची नोंद स्थानिक समाजाने स्वतः जपायला हवी.
आपल्याच भूभागात झालेला लढा विसरू नये यासाठी, शाळा, महाविद्यालये, इतिहास अभ्यास केंद्रे, साहित्यिक मंडळे, आणि मीडिया यांनी पुढाकार घ्यायला हवा.

सीमा भागातील जनतेच्या अपेक्षा
मराठवाडा मुक्ती दिन हा एक दिवस नसून, ही मराठवाड्याच्या अस्मितेची शपथ आहे. हा लढा विसरला गेला, तर तो फक्त इतिहासाची हानी नाही, तर समाजाच्या आत्मभानाचा अपमान आहे.
शासनाने 17 सप्टेंबरला अधिकृत शासकीय महत्त्व दिले पाहिजे
शैक्षणिक अभ्यासक्रमात याचा समावेश करायला हवा
प्रसिद्ध पंचांगांमध्ये या दिनाची नोंद असणे बंधनकारक करावे
स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम, स्मृतीदिन आणि गौरव समारंभ व्हावेत
“लढा विसरणे म्हणजे स्वतःचा इतिहास मोडणे” हे लक्षात घेऊन – मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या स्मृतीला जागरुकतेने जिवंत ठेवले पाहिजे.

…लेखक… गोविंद मुंडकर, mundkar.govind@gmail.com, Mobile 832 909 5303

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button