नांदेड l जिल्ह्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, ग्रामीण भागातील रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्याला एकूण 29 कोटी 42 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला असून या संदर्भात ई-टेंडर प्रक्रियासुध्दा सुरु करण्यात आली आहे. हा निधी उपलब्ध व्हावा यासाठी माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खा.अशोकराव चव्हाण व खा.डॉ. अजित गोपछडे यांनी पाठपुरावा केला होता.


15व्या वित्त आयोगांतर्गत बीपीएचयु व नवीन उपकेंद्रांच्या बांधकामासाठी केंद्र शासनाकडे जिल्हा परिषदेमार्फत प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने 15 व्या वित्त आयोगातून जिल्ह्यातील नायगाव, देगलूर, अर्धापूर, नांदेड व उमरी या ठिकाणी बीपीएचयु इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील 44 ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी प्निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या निर्मितीमध्ये भोकर विधानसभा मतदारसंघातील कामठा, पार्डी, लोणी, कोळगाव, हळदा व बेंबर येथील उपकेंद्रांचा, तर अर्धापूर येथे बीपीएचयु केंद्राच्या इमारत बांधकामाचा समावेश आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने हा निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना बळकटी मिळणार आहे. याबद्दल राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण व खा.डॉ. अजित गोपछडे यांचे जनतेतून आभार व्यक्त होत आहेत.
