
गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेनुसार याही वर्षी श्री परमेश्वराच्या महाशिवरात्र यात्रा उत्सवाची सुरुवात दिनांक दि. १३ फेब्रुवारी रोजी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याने होणार आहे. ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे मुख्य व्यासपीठ शिवाजी महाराज जाधव वडगावकर हे सांभाळणार आहेत. तर महाशिवरात्री दिवशी म्हणजे दिनांक १५ रविवारी मध्यरात्री १२ ते ३ वाजेच्या दरम्यान श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार सौ.पल्लवी टेमकर यांच्या हस्ते श्री परमेश्वराच्या मूर्तीचा अभिषेक महापुजा आणि पाच पुरोहिताच्या वेदशास्त्र मंत्रोच्चाराच्या मंगलमय सोहळ्यात अलंकार सोहळा संपन्न होणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी बुलढाणा अर्बन बैंक, पवन फर्निचर, महाराष्ट्र ग्रामीण बैंक व मार्कंडेय नागरी सहकारी बैंकेतर्फे भाविकांना उपवासाच्या फराळाचे वितरण केले जाणार आहे.

महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भगवान शंकराच्या अवतारातील श्री परमेश्वर दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच मंदिर परिसरात मोठी गर्दी होणार आहे. बम बम भोले…. हर-हर महादेवाच्या जयघोषाने संपूर्ण वाढोणा परिसर दुमदुमून निघणार आहे. दुसऱ्या दिवशीपासून ते दहीहंडी काल्यापर्यंत भाविक भक्तांना श्री परमेश्वराचे अलंकारमय दर्शन घेता येणार आहे. दिनांक २० फेब्रुवारी रोजी ग्रंथराज ज्ञानेश्वरीची भव्य पालखी मिरवणूक टाळ मृदांगच्या गजरात शहरातील मुख्य रस्त्याने काढण्यात येणार आहे. त्यानंतर काल्याचे कीर्तन हभप.नारायण महाराज गरड यांच्या मधुर वाणीतून होणार असून, या कीर्तनाने ज्ञानेश्वरी सप्ताहाचा समारोप बुंदी व काल्याचा प्रसाद वितरणाने केला जाणार आहे.


रात्रीला बैलगाडीतून शहरातील मुख्य रस्त्याने राधा कृष्ण झाकीची मिरवणूक ढोल ताश्याच्या गजरात काढली जाणार आहे. दरम्यान दिनांक १४ ते २० फेब्रुवारी पर्यंत दररोज रात्रीला ब्राम्हण समाज, मराठा समाज, माळी समाज, आर्यवैश्य समाज, पद्मशाली समाज, वीरशैव समाजाच्या वतीने भव्य अशी पारंपरिक पंगतीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या सप्ताह कालावधीत दररोज पारंपरिक धार्मिक विधी, अभिषेक, महापूजा, रुद्राभिषेक, काकडा, प्रवचन, हरिपाठ, तसेच प्रसिद्ध नामवंत कीर्तनकार हभप. भगवती किशोर देशपांडे – नांदेड, हभप.सुरेश महाराज पोफळीकर – पुसद, हभप.शिवाजी महाराज पवार – पैठण, हभप.उद्धव महाराज ठोंबरे – दिंद्रुडकर, हभप.महेश महाराज महाजन – आळंदी, हभप.मयूर महाराज कोंडे – पुणे, बालयोगिनी मुक्तिनाथ गुरु महेश्वरीनाथ – टाकराळा यांच्या मधुर वाणीतून दररोज रात्री ९ ते ११ वेळेत हरिकीर्तन व भजन मंडळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी यात्रेला आध्यात्मिक वातावरण लाभणार आहे.

तसेच यात्रा काळात पारंपरिक शालेय बडबड गीत स्पर्धा, महिलांसाठी विविध स्पर्धा, लहान मुला मुलींसाठी वेशभूषा स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय भव्य लेझीम स्पर्धा, विविध गुणदर्शन तथा सांस्कृतिक कार्यक्रम, महाराष्ट्राचा प्रसिद्ध खेळ भव्य कबड्डी स्पर्धा, शेतकऱ्यांसाठी पशुप्रदर्शन व भव्य शंकरपट स्पर्धा (बैलगाडा शर्यत) , बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या उपस्थितीत भव्य भजन स्पर्धा होणार आहे. भव्यदिव्य अशी कुस्ती स्पर्धा, आदी कार्यक्रमांमुळे ग्रामसंस्कृतीचे दर्शन भाविक, खेळाडू, कुस्ती शौकिनांना घडणार आहे. तब्बल १२ लक्ष ५१ हजारच्या निधीतून यात्रेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस दाते व मंदिर कमिटीच्या वतीने बक्षिस व श्रीची प्रतिमा आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. दिनांक ०१ मार्च रोजी महाशिवरात्री यात्रेचा समारोप यात्रा उत्सव काळात सहकार्य करणाऱ्या सर्वांचा स्वागत सत्कार करून होणार आहे.
यात्रा निमित्ताने परिसरात विविध व्यावसायिक स्टॉल्स, खेळणी, खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, कृषी साहित्य, महिलांसाठी आवश्यक असलेल्या वस्तू आदींसह विविध प्रकारची दुकाने थाटण्यात येणार असून स्थानिक व्यावसायिकांना याचा मोठा लाभ होणार आहे. या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा यात्रा महोत्सव ठरणार आहे. एकूणच भव्य यात्रा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, मंदिराची रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले आहे.
यात्रा काळात भाविकांची गैरसोय होणार नाही आणि सुरक्षित तेसाठी पोलिस प्रशासन, नगरपंचायत, देवस्थान ट्रस्ट व स्वयंसेवकांच्या सहकार्याने चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, वाहतूक नियोजन यावर विशेष लक्ष दिले जात आहे. श्री परमेश्वराची महाशिवरात्री यात्रा महोत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून सामाजिक एकात्मता, श्रद्धा आणि परंपरेचे प्रतीक आहे. महाशिवरात्री व यात्रा काळात भाविकांनी शिस्त पाळून दर्शन घ्यावे व मंदिर कमिटीला सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

