नांदेड| अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत महा-डीबीटी पोर्टल प्रणालीवर शाळा व विद्यार्थी अर्ज नोंदणी करण्याची प्रक्रीया सुरु आहे. या प्रक्रियेत जिल्ह्यातील 86 टक्के शाळा नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे. यात 3 हजार 827 शाळांपैकी 3 हजार 296 शाळांनी महाडीबीटी पोर्टल प्रणालीवर शाळा नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. तरी उर्वरित 531 शाळांनी शाळा नोंदणीची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.


शिष्यवृत्ती योजना या म्यानुअली/ऑफलाईन पध्दतीने राबविण्यात येत होत्या. परंतु सन 2024-25 पासून या योजना राबविण्यासाठी महाडीबीटी पोर्टल प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांनी www.prematric.mahait.org/login या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने कार्यवाही करावयाची आहे.


मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. इयत्ता 5 वी ते 7 वी व इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना. इयत्ता 5 वी ते 10 मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या मुला-मुलींसाठी राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना. इयत्ता 10 वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या मुला-मुलींसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे परीक्षा शुल्क प्रधान योजना. इयत्ता 1 ली ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना. इयत्ता 9 वी 10 मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या मुला-मुलींसाठी भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना या आहेत.


शाळा नोंदणी प्रक्रीयेतनंतर विद्यार्थ्यांच्या अर्ज नोंदणीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरावयाची कार्यवाही शाळा मुख्याध्यापकांनी करावी. जेणेकरुन विद्यार्थ्यांना मॅट्रीक पूर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ तात्काळ अदा करणे सोयीचे होईल. तसेच कार्यवाही न केल्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गाचे विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची राहील, याची नोंद घ्यावी असेही समाज कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.



