देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर शहरातील मोंढा बाजारपेठेत सोमवारी भाजपची जनसंवाद सभा पार पडली. या सभेत खासदार अशोकराव चव्हाण यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.


गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि शिवसेनेचे आमदार (वि.प.) हेमंत पाटील यांनी खा. चव्हाण यांच्यावर टिकाटिप्पणी केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना खा. चव्हाण म्हणाले, “शिव्या देत मते मागणे हा काहींचा धंदा झाला आहे. माझं नाव शंभर वेळा घेऊन जप करण्यापेक्षा तुम्ही जनतेसाठी काय विकास केलात, हे दाखवा.”


ते पुढे म्हणाले, “नकारात्मक राजकारणामुळे नांदेड जिल्ह्याचा विकास खुंटत आहे. मी आजवर नेहमी विकासात्मक कामांनाच प्राधान्य दिले आहे. नांदेडमधून विमानसेवा सुरू झाली, वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली, प्रधानमंत्री आवास योजनेतून १६ हजार घरे पूर्ण झाली आहेत आणि २० लाख घरांचे नियोजन सुरू आहे.”


चव्हाण यांनी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेतील भरती घोटाळ्यास आळा घालण्यात आला. आता गुणवत्तेवर आधारित ऑनलाईन भरती सुरू आहे. जिल्हा बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मी मुख्यमंत्री असताना १०० कोटी रुपयांची मदत दिली होती.”


ते पुढे म्हणाले, “आर्थिक अडचणी असूनही शेतकऱ्यांसाठी ३० हजार कोटी रुपयांचे पॅकेज सरकारने दिले आहे. काही जण चुकीच्या अफवा पसरवत आहेत, पण सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. विकासाच्या आड येणाऱ्यांना जनतेने उखडून फेकून द्यावे.”
सभेत अर्ध्याअधिक खुर्च्या रिकाम्या!
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणासाठी पावसातही लोकांनी डोक्यावर खुर्च्या धरून उपस्थिती लावली होती. मात्र, सोमवारी झालेल्या भाजपच्या सभेत गर्दीचा अभाव जाणवला. अनेक खुर्च्या रिकाम्या राहिल्याने कार्यकर्त्यांत नाराजीचे सूर ऐकू आले आणि नेतृत्वाच्या जनाधाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले.


