हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर तालुक्यात आणि शहरात अवैधरित्या देशी-विदेशी दारू, गुटखा आणि पानमसाला वाहतूक तसेच चौपाटी परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांविरोधात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे युवा तालुकाध्यक्ष माधव किशन शिंदे यांनी पोलिस प्रशासनाला निवेदन दिले असून, १० नोव्हेंबर २०२५ पासून हिमायतनगर पोलीस स्टेशनसमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.


माधव शिंदे यांनी नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हिमायतनगर तालुक्यासह शहरात रात्री उशिरा बोलोरो, लोडिंग पिकअप, कंटेनर ट्रक यांच्यामार्फत गुटखा, पानमसाला आणि देशी-विदेशी दारूची अवैध वाहतूक केली जात असून, हे सर्व पोलिसांच्या संगनमताने सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच, शहरातील चौपाटी, उमर चौक, बाजार चौक, पार्डी रोड आदी ठिकाणी जुगार अड्डे खुलेआम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.


या अवैध धंद्यांमुळे तरुणाई व विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, रात्री उशिराच्या वाहतुकीमुळे अपघातांचा धोका वाढला असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. शिंदे यांनी आपल्या निवेदनात काही मागण्या केल्या आहेत, रात्री बारा ते पहाटे पाच वाजेपर्यंत विशेष पोलिस गस्त लावावी. अवैध दारू व गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर मोक्का आणि तडीपारीची कारवाई करावी. किराणा दुकान व पानटपरीवरील किरकोळ गुटखा विक्री त्वरित बंद करण्यात यावी. परवानाधारक देशी दारू दुकानदारांकडून ग्रामीण भागात होणारी अवैध वाहतूक थांबवून संबंधितांचे लायसन्स रद्द करावे. गुटखा तस्करांवर कठोर कायदेशीर कारवाई करून हा धंदा कायमस्वरूपी बंद करावा.


शिंदे यांनी इशारा दिला आहे की, जर या मागण्यांवर तातडीने कार्यवाही झाली नाही, तर १० नोव्हेंबरपासून बेमुदत आमरण उपोषण केले जाईल. तसेच, “या विषयावर माझ्या जीवितास काही अनिष्ट घडल्यास त्यास पोलीस निरीक्षक जबाबदार राहतील,” असेही त्यांनी निवेदनात स्पष्ट नमूद केले आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, विशेष पोलिस महानिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक हिमायतनगर यांना देण्यात आली आहे.




