हिमायतनगर,अनिल मादसवार| येथील पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाजार चौक परिसरातील एक जनरल स्टोअर्स, दोन किराणा दुकान आणि मस्जिदजवळील एक कापड दुकानाचे शटर उचलून अज्ञात चोरटयांनी नगदी रक्कम व किंमती माल लंपास केला आहे. तसेच एक सोन्याचांदीचे दुकान, दोन कापड दुकान व इतर दोन दुकानाचे कुलूप फोडण्याचा प्रयत्न झाला मात्र चोरट्याना यश आले नाही. एकाच रात्रीतून एवढी दुकाने फोडण्याचा प्रयत्न झाल्याने व्यापारी वर्ग व नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी शहरासाठी कर्तव्यदक्ष पुरुष पोलीस जमादाराची नियुक्ती करून रात्रगस्त वाढवावी. तसेच तोंडाला काळा मास्क लाऊन धुमाकूळ माजविणाऱ्या लाल – पिवळ्या पट्टी गैंगचा बंदोबस्त करून चोरीच्या घटनां पुन्हा होणार नाही याची दक्षता घेऊन नागरिकांना सुरक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे.
हिमायतनगर शहरात गेल्या काही महिन्यपूर्वी झालेली चोरी उघडकीस आल्यानंतर अज्ञात चोरट्यानी बोऱ्या बिस्तर गुंडाळला होता. मात्र पुन्हा अज्ञात ८ ते १० लाल – पिवळ्या पट्टी गैंगच्या चोरट्यांनी तोंडाला काळा मास्क लाऊन दिनांक २४ मंगळवारच्या मध्यरात्री हिमायतनगर शहरात धुमाकूळ माजविला आहे. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाजार लाईनमधील नवल सेठ पिंचा यांचे जनरल स्टोअर्स फोडून नगदी रक्कम अंदाजे १५ हजार रुपये, राज यशवंतकर यांचे किराणा दुकानातून अंदाजे ११ हजार रुपये व अंजीर, पिस्ता, काजू, तर किरण अमृतसागर यांचे किराणा दुकानातून ४० हजार रुपये व इतर सामान व शहरातील मोमीनपुरा चौकातील मस्जिद कॉम्प्लेकमध्ये असलेल्या पठाण यांचे सुहाग कापड दुकानाचे शटर टॉमी किंवा जैकच्या साहाय्याने वाकवून नगदी १५ हजारांची रक्कम व साहित्य असे एकूण लाखो रुपयाचा मुद्देमाल चोरून पसार झाले आहेत. तसेच मार्केटमधील वर्धमान मेन्सचे गोडाऊन, गुरुकृपा क्लॉथ, ओम ज्वेलर्स, आणि अन्य दोन दुकानाचे कुलुप तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र यात चोरट्याना यश आले नसल्याचे कुलूपवार पडलेल्या खाच्यांवरून दिसून येत आहे.
चोरीच्या घटनेला यशस्वी करण्यासाठी चोरटयांनी तोंडाला लाल, पिवळ्या पट्ट्या व दस्ती तसेच तोंडाला काळे मास्क बांधून हे काम फत्ते केले आहे. मध्यरात्री १ वाजेपासून ते ३ वाजेच्या दरम्यान चोरट्यानी हा प्रकार केला असून, काही दुकाना जवळील सीसीटीव्ही कैमरे फोडून चोरी केल्याचे दिसून येत आहे. हिमायतनगर शहरात एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात दुकानात चोरीच्या घटना घडल्यामुळे शहरातील व्यापारी वर्गात व नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात चोरट्यांनी डोक्यावर आणि तोंडावर लाल व पिवळ्या पट्ट्या व तोंडाला काळ मास्क बांधून चोऱ्या केल्याचे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, या चोंरट्यानी जणू काही पोलिसांना पकडण्याचे आव्हानच दिले कि काय..? असे या चोरीच्या घटनेवरून दिसून येत आहे.
एकूणच गेल्या काही दिवसापासून हिमायतनगर पोलिसांच्या रात्रगस्तीमध्ये कमालीची घट झाल्यामुळे चोरट्याना रान मोकळे झाले आहे. याचाच फायदा घेत अज्ञात आठ ते नऊ चोरट्याच्या टोळक्याने हिमायतनगर शहरात एकच रात्री वेगवेगळ्या परिसरात जवळपास ४ दुकानावर दरोडा टाकला तर ४ ते ५ दुकाने उघडता आले नसल्याने चोरट्यांचा डाव फसला आहे. एकूणच हिमायतनगर शहरात झालेल्या या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रग्रस्त वाढवून लहान मोठ्या व्यापाऱ्यांना सुरक्षा द्यावी तसेच शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने हिमायतनगर शहराला कर्तव्यदक्ष धाडसी पुरुष बिट जमादार नेमावा, एकाच दिवशी एवढी मोठी दुकाने फोडणाऱ्या लाल, पिवळ्या गैंगच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी शहरातील नागरिक व्यापारी वर्गातून केली जात आहे.
श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांच्या माध्यमातून चोरीचा तपास सुरु
एकाच दिवशी घडलेल्या एवढ्या मोठ्या चोरीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांकडून सकाळी ९ वाजता श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वानाने पोलीस ठाण्यापासून ते सुहाग क्लॉथ सेंटर, नवलचंद पिंचा यांचे जनरल स्टोअर्स आणि बाजारपेठेच्या मुख्य मार्गावरून थेट बोरगडी रस्त्याच्या सदाशिव कॉम्प्लेक्स पर्यंत माघ काढला तेथून अज्ञात चोरट्यांची टोळी कोणत्यातरी वाहनाने पसार झाले असल्याचे संकेत दिले आहे. तर ठसे तज्ज्ञांनी ठश्याचे नमुने घेऊन लैबला पाठविले असून, पोलिसांचे एक विशेष पथक चोरीच्या तपासाला गती देण्यासाठी कामाला लागले आहेत. दरम्यान दुपारी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी चोरी झालेल्या ठिकाणी भेट देऊन पोलिसांना चोरीच्या घटनेचा तात्काळ तपास लावावा आणि नागरिकांना सुरक्षा द्यावी अश्या सूचना केल्या आहेत.