किनवट, परमेश्वर पेशवे| नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील परोटी तांडा येथे 17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी पाच वाजताच्या सुमारास घडलीय
1 सप्टेंबर ते 2 सप्टेंबर च्या दरम्यान किनवट तालुक्यात अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने परोटी तांडा येथील शेतकरी जयराम सखाराम राठोड शेत सर्वे नंबर 112 मधील पिकासह शेती खरडून गेल्याने हा शेतकरी हवालदील झाला होता. यावर्षी तरी चांगले पिकेल आणि उत्पादनात वाढ होईल आणि घेतलेले बँकेची कर्ज फेडता येईल या आशेने तो जगत होता मात्र सप्टेंबरच्या सुरुवातीलाच झालेल्या अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतातील पिकासह शेती खरडल्याने आता पीक कर्ज कसे फेडावे असे म्हणत निराशजन्य परिस्थितीत तो सतत राहायचा.
घरच्यांनी त्यांना अनेक वेळा सांगितले आपण कुठेही काम करू आणि कर्जफेडू पण शेवटी 17 सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजल्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरीच त्यांनी कुठले तरी विषारी औषध घेतल्याचे त्यांच्या घरच्यांना लक्षात आल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्यांना वाचवण्यासाठी इस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. येथील वैद्यकीय अधिकारी S M खुपसे यांनी जयराम सखाराम राठोड यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी व शवविच्छेदन करून हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी खूपसे यांनी दिली.