नांदेड| नांदेड शहरात सीसीटीव्ही यंत्रणा व नियंत्रण कक्ष उभारण्यासाठी शासनाकडे सादर १०० कोटी रुपयांच्या कामाचा प्रलंबित प्रस्ताव तपासून त्याला मान्यता देण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आ. श्रीजया चव्हाण यांना दिले आहे.


मंगळवारी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात आ. श्रीजया चव्हाण यांनी याबाबत उपप्रश्न विचारला होता. या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिलेली आहे. मात्र, अद्याप निधी मिळाला नसल्याकडे आ. श्रीजया चव्हाण यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले. सर्व तालुक्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावून त्याच्या देखभाल व दुरुस्तीसाठी तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.


सीसीटीव्हीची देखभाल व दुरुस्ती संदर्भात त्यांनी विचारलेल्या अन्य उपप्रश्नावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री पुढे म्हणाले की, या कामासाठी संपूर्ण राज्यात एकसूत्रता आणण्याकरिता गृह विभाग एसओपी तयार करीत असून, ते लवकरच वितरित होतील.




