
हदगाव (गौतम वाठोरे) हदगाव तालुक्यातील पळसा येथे शेतात काम करत असताना एका महिलेवर रानडुकराने अचानक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात जनाबाई लक्ष्मीमन वालगोटवाड (वय ५५) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत.


जनाबाई वालगोटवाड या शेतमजुरीचे काम करीत असून त्या आपल्या शेतात तूर कापणी करत असताना अचानक रानडुकराने त्यांच्या अंगावर झडप घातली. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या आरडाओरडीनंतर शेजारील शेतकऱ्यांनी धाव घेत रानडुकराला हुसकावून लावत त्यांना वाचवले. त्यानंतर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने नांदेड येथील विष्णुपुरी रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती हदगाव येथील वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र घटनेनंतरही अद्याप पंचनामा करण्यात आलेला नाही तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी जखमी महिलेची भेट घेतलेली नाही, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे वनविभागाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.


गेल्या काही दिवसांत तालुक्यात वन्यप्राण्यांची मानवी वस्तीकडे वाढती वर्दळ दिसून येत आहे. जंगलातील पाणवठे आटल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात शेतशिवार व वस्त्यांकडे येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.

दरम्यान, जखमी जनाबाई वालगोटवाड यांच्या कुटुंबाला तात्काळ पंचनामा करून शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी खंदारे यांची बदली करून त्यांच्या कार्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

