नांदेड| मतदानाचा टक्का वाढावा तसेच दिव्यांग आणि 85 वर्षावरील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांच्या सूचनेनुसार एक ही मतदार मतदाना पासून वंचित राहू नये यासाठी 85 वर्ष वयाच्या वरील मतदारांच्या घरी जाऊन आज मतदान करून घेतले.
आज नांदेड उत्तर मतदार संघातील कैलास नगर प्रभागातील वरिष्ठ नागरिक मोहनराव शिंदे यांच्या घरी जाऊन मतदान घेण्यात आले. श्री शिंदे यांनी लोकसभा व विधानसभा मतदार संघासाठी मतदानाचा हक्क बजावला. या वेळी मतदान अधिकारी सौ सरस्वती शिंदे, रोहिदास बसवंरे, सूक्ष्म निरीक्षक बालाजी अंचेवार, सहाय्यक मतदान अधिकारी आर. एम. जाधव, पोलीस कर्मचारी पांचाळ आदी उपस्थित होते.