Son Becomes Police : आईच्या कष्टाच चीज; मुलगा पोलिस बनला

IMG 20260329 221030 Son Becomes Police : आईच्या कष्टाच चीज; मुलगा पोलिस बनला

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | “कष्टाचं फळ गोड असतं” या म्हणीचा प्रत्यय हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथील रोहित बिच्चेवार यांच्या यशातून पुन्हा एकदा आला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आईच्या कष्टांवर वाढलेला मुलगा आज पोलिस दलात दाखल झाला असून संपूर्ण परिसरात त्याचं कौतुक होत आहे.

रोहित संदिप बिच्चेवार यांचे वडील त्याच्या अवघ्या पाचव्या वर्षीच वारले. घराची सर्व जबाबदारी आई वनिताबाई यांच्या खांद्यावर आली. लहान दोन मुलांना सांभाळत त्यांनी रोजमजुरी करून कुटुंब चालवलं. अक्षरशः विळ्याच्या आणीवर दिवस काढत मुलांचं संगोपन आणि शिक्षण पूर्ण केलं.

IMG 20260329 WA0051 Son Becomes Police : आईच्या कष्टाच चीज; मुलगा पोलिस बनला

रोहितचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा सरसम येथे, तर दहावीपर्यंतचं शिक्षण देशमुख विद्यालयात पूर्ण झालं. पुढे हिमायतनगर येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्याने पोलिस भरतीची तयारी सुरू केली. आर्थिक परिस्थितीमुळे महागड्या क्लासेस किंवा अकॅडमीचा आधार न घेता स्वतःच्या जिद्दीवर त्याने अभ्यास, व्यायाम आणि मैदानी सराव सुरू ठेवला.

IMG 20260329 WA0056 Son Becomes Police : आईच्या कष्टाच चीज; मुलगा पोलिस बनला

त्याच्या मेहनतीचं फळ म्हणून रोहितने लेखी परीक्षेत ८७ गुण आणि मैदानी चाचणीत ४१ गुण मिळवत एकूण १२८ गुणांसह ओबीसी प्रवर्गातून केवळ २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात नांदेड पोलिस भरतीत यश मिळवलं. रोहितच्या यशामागे त्याच्या आईची अथक मेहनत आणि त्याची जिद्द महत्त्वाची ठरली. आयुष्यभर संघर्ष करत मुलांना उभं करणाऱ्या वनिताबाई यांनी मात्र कोणताही दिखावा न करता शांतपणे मुलाच्या यशाचा आनंद घेतला. “आणखी मोठं हो” एवढीच अपेक्षा त्यांच्या डोळ्यांत दिसून आली.

रोहित पोलिस झाल्याची बातमी समजताच गावात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. सरसम गावी परतल्यावर मित्रांनी डीजे आणि गुलालाच्या उत्साहात त्याचं स्वागत केलं. आईने ओवाळून मुलाचं स्वागत करत नव्या स्वप्नांना बळ दिलं. रोहितची ही यशोगाथा अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असून “परिस्थिती नव्हे, तर जिद्द मोठी असते” हे पुन्हा सिद्ध झालं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top