हिमायतनगर, अनिल मादसवार | गणेशोत्सव म्हटले की देखावे, डीजे आणि अनाठायी खर्चाला प्राधान्य देणाऱ्या मंडळांच्या गर्दीत हिमायतनगरच्या परमेश्वर गल्लीतील ओम बाल गोपाळ गणेश मंडळाने सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श निर्माण केला आहे. उत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा देत मंडळाने यंदाही जिल्हा परिषद कन्या शाळेच्या विद्यार्थिनींसाठी २५ लिटरचा कुकर, स्मार्ट बोर्ड आणि दोन पंखे भेट दिले.


गेल्या तीन वर्षांपासून मंडळाने डीजेसह इतर अनाठायी खर्च टाळून शाळेच्या गरजा पूर्ण करण्याला प्राधान्य दिले आहे. या तीन वर्षांत मंडळाने सुमारे साडेतीन लाख रुपयांचे शैक्षणिक व उपयुक्त साहित्य शाळेला उपलब्ध करून दिले आहे. गणेशोत्सवातील वर्गणीचा पैसा समाजोपयोगी कामासाठी खर्च करण्याचा मंडळाचा हा उपक्रम सर्व स्तरांतून कौतुकाचा विषय ठरत आहे.


कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अक्कलवाड सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश पाळजकर, ॲड. गुंडाळे, रामराव सूर्यवंशी, नारायण माने, शरद चायल, मुन्नाभाऊ शिंदे, अशोकराव अनगुलवार, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, रामभाऊ सूर्यवंशी, विनायक ढोणे यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष प्रवीण वानखेडे, किरण माने, विशाल नरहारे, गजानन हरणे, अजय माने, तेजस हरणे, गणेश रचेवार, सुधाकर चिट्टेवार, संतोष साभळकर, विद्यार्थी, पालक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.




‘गणेशोत्सवाचा पैसा विद्यार्थ्यांच्या कामी यावा’ – यावेळी उपस्थित मान्यवरांनी मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करत इतर गणेश मंडळांनीही ओम बाल गोपाळ मंडळाचा आदर्श घेऊन उत्सवाचा खर्च सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी वळवावा, असे आवाहन केले. भक्तीला समाजसेवेची जोड देणाऱ्या या उपक्रमातून गणेशोत्सवाचा खरा सामाजिक संदेश अधोरेखित झाला.

७०० विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न – दरम्यान, शाळेचे मुख्याध्यापक कदम सर यांनी शाळा सुटण्याच्या वेळी जवळपास ७०० विद्यार्थी मुख्य रस्त्यावरून ये-जा करतात. त्याचवेळी वाहनांची व नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे शाळा सुटण्याच्या वेळी किमान एक तास पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी द्यावा, अशी मागणी त्यांनी पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्याकडे केली.

यावेळी शाळेच्या विकासासाठी मुथूट फायनान्सकडून १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टकडून वर्गखोल्या बांधून देण्याची तयारी दर्शविण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक कदम यांनी दिली. त्यामुळे शाळेच्या भौतिक सुविधांना आगामी काळात मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

