Homeकरियरतीन एकर कोरडवाहू शेतीतून घडले तीन डॉक्टर

तीन एकर कोरडवाहू शेतीतून घडले तीन डॉक्टर

वाळकेवाडीच्या आदिवासी कुटुंबाची प्रेरणादायी भरारी आईच्या जिद्दीला मुलांच्या मेहनतीची साथ; गावकऱ्यांनी पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव

हिमायतनगर, अनिल मादसवार| परिस्थिती प्रतिकूल असली तरी जिद्द, कष्ट आणि शिक्षणाची साथ असेल तर यशाचा मार्ग नक्कीच गवसतो, हे वाळकेवाडी येथील एका आदिवासी शेतकरी कुटुंबाने दाखवून दिले आहे. अवघी तीन एकर कोरडवाहू शेती, मर्यादित आर्थिक परिस्थिती आणि अनेक अडचणींवर मात करत एकाच कुटुंबातील तीनही भावंडांनी डॉक्टर होण्याचा मान मिळविला आहे. या यशामुळे वाळकेवाडी गावाचा शैक्षणिक क्षेत्रात गौरव वाढला असून, पंचक्रोशीतून वाळके कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वाळकेवाडी येथील सौ. सूर्यकांता तानाजी वाळके यांच्या कुटुंबाची परिस्थिती बेताची. उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन अवघी तीन एकर कोरडवाहू शेती. मात्र परिस्थितीला शरण न जाता त्यांनी मुलांना उच्च शिक्षण देण्याचा निर्धार केला. आईच्या या जिद्दीला तिन्ही मुलांनी अथक परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयवेडाची जोड दिली.

वाळके कुटुंबातील मोठा मुलगा स्वप्नील वाळके यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे सेवा बजावण्याचा टप्पा गाठला. त्यानंतर कु. वैष्णवी वाळके हिने निमशासकीय कोट्यातून लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवत वैद्यकीय क्षेत्रातील आपली वाटचाल सुरू केली. आता कु. तेजस्विनी वाळके हिने नांदेड येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश मिळवत कुटुंबाच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

शेतकरी कुटुंबातील तीन भावंडे वैद्यकीय क्षेत्रात दाखल होणे ही केवळ वाळके कुटुंबाचीच नव्हे, तर संपूर्ण आदिवासी समाजासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. आर्थिक अडचणी, कोरडवाहू शेती आणि ग्रामीण भागातील मर्यादित सुविधा यांना न जुमानता शिक्षणाच्या जोरावर या तिन्ही भावंडांनी मिळविलेले यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

तेजस्विनीच्या यशाची बातमी समजताच वाळकेवाडी ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. आईच्या कष्टांचे चीज करणाऱ्या या तिन्ही भावंडांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, “परिस्थिती कितीही कठीण असो, शिक्षणाची कास धरली तर यश निश्चित मिळते,” असा संदेश या कुटुंबाच्या वाटचालीतून पुढे आला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments