स्वच्छता मोहिमेसह वृक्षारोपण; विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव
हिमायतनगर, प्रतिनिधी| शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात गुरुवारी (दि. २४ सप्टेंबर) राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली व स्टाफ सेक्रेटरी प्रा. एम. पी. गुंडाळे यांच्या नियोजनातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. आशिष दिवडे व प्रा. मुकेश यादव यांनी कार्यक्रमाची आखणी केली. दिनानिमित्त रा.से.यो.च्या स्वयंसेवकांनी महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला. त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले.


कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापनेमागील प्रेरणास्थान राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच हैदराबाद मुक्तिसंग्रामात बलिदान देणारे महाविद्यालयाचे नामकरण ज्यांच्या नावाने करण्यात आले आहे, त्या हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. दत्ता मगर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रवीण सावंत यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व व उद्दिष्टे याबाबत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबत नेतृत्वगुण, स्वावलंबन, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी व समाजाप्रती आपुलकीची भावना विकसित होते. तसेच सामाजिक समस्या समजून घेऊन त्या सोडविण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.से.यो.च्या विद्यार्थिनी कु. नंदिनी भगत व कु. प्रगती बारलावार यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. आशिष दिवडे यांनी केले, तर आभार प्रा. मुकेश यादव यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

